भाजपा नव्हे गिरीश महाजनांचा विश्‍वास अल्पमतात

0

स्व.प्रमोद महाजन यांना भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जायचे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर निर्माण झालेले पेचप्रसंग त्यांनी लिलया सोडवले आहेत. त्यांच्या निधनानंतर देशपातळीवर निर्माण झालेली पोकळी आतापर्यंत भरुन निघालेली नाही. मात्र गेल्या वर्षभराच्या काळात महाराष्ट्रात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत:ची तशी ओळख निर्माण केली आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तिय म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्यावर कुंभमेळ्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शेतकरी आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा आंदोलनापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करुन वाटाघाटी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. निवडणुकांदरम्यान पक्षनिष्ठा जपणार्‍यांना वेळप्रसंगी बाजूला ठेवून विजयी होणार्‍या उमेदवारांना अन्य पक्षातून भाजपात आयात करत भाजपाला विजय मिळवून देण्याचा त्यांचा फॉम्यूला महाजन किंवा जळगाव पॅटर्न म्हणून ओळखला जावू लागला आहे. या फॉर्म्यूल्यामुळे नाशिक व जळगाव महापालिकेसह जामनेर नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला. त्याआधी काँगे्रसला जवळ करत शिवसेनेला दुर ठेवण्याची खेळी देखील महाजन यांनी जळगाव जिल्हा परिषदेत केली आहे. मात्र महाजनांनी घेतलेले निर्णय हे केवळ अल्पकाळ दिलासा देणारे होते, याची प्रचिती जिल्हा परिषदेत सुरु असलेल्या गोंधळावरुन दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेत भाजपा 33, राष्ट्रवादी 16, शिवसेना 14 व काँग्रेस 4 असे पक्षिय बलाबल आहे. सत्ता स्थापनासाठी स्पष्ट बहुमत नसल्याने गिरीश महाजन यांनी शिवसेनेला सोबत न घेता भाजपा व काँग्रेस अशी युती करत सत्ता स्थापन केली. यात काँग्रेसला एक सभापती पद देखील देण्यात आले. मात्र सत्तास्थापनेपासून भाजपाच्या अंतर्गत कुरुबुरी वाढल्या आहेत. यास खडसे-महाजन वादाची पार्श्‍वभुमी निश्‍चितच आहे मात्र त्यापेक्षाही अधिक स्वार्थी व घातकी राजकारणाचा प्रभाव जास्त आहे. मध्यंतरीच्या काळात हे वाद वाढल्याने महाजनांना मध्यस्थी करत दिलजमाई घडवावी लागली होती मात्र या वादाने पुन्हा डोकं वर काढले आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत 120 कोटी रुपयांचे नियोजन करण्याच्या विषयावरुन सत्ताधारी भाजपातच उभी फुट पडली. या विषयावर घेण्यात आलेल्या मतदानात भाजपाच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात भाजपाच्या 23 आणि राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी 13 अशा 49 सदस्यांनी मतदान करत पदाधिकार्‍यांना झटका दिला. यास अनेक करणे आहेत, यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा वाढता हस्तक्षेप, ठराविक पदाधिकार्‍यांना देण्यात येणारे झुकते माप, भाजपाच्या ज्येष्ठ सदस्यांना विश्‍वासात न घेणे व जिल्हा परिषदेचा कारभार ठेकेदारांच्या सल्ल्याने चालविणे, यांचा समावेश आहे. सर्वसाधारण सभेत जे घडले त्यामुळे भाजपा नव्हे तर गिरीश महाजन यांची पकड व विश्‍वास अल्पमतात आला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांना सोबत घेत भाजपाच्या नाराज सदस्यांनी बांधलेली मोट भाजपासह नेत्यांची डोकंदुखी ठरु शकते कारण ठराविक लोकांची मनमानी अशीच सुरु राहिली तर विद्यमान पदाधिकार्‍यांवर अविश्‍वास आणून सत्ता परिवर्तन होण्यास फारसा वेळ लागणार नाही. हे गिरीश महाजनांसाठी देखील घातक आहे. कारण महाजनांच्या राजकीय जुळवाजूळवीत दुरदृष्टीचा अभाव असतो, असा संदेश राज्यभर पसरण्यास वेळ लागणार नाही!