भाजपा मतदारांसाठी एक चांगली गुंतवणूक बँक

0

नाशिक । मतदान करणे म्हणजे चांगली गुंतवणूक करणे आणि चांगली गुंतवणूक म्हणजे चांगला परतावा हे लक्षात घेतल्यास भारतीय जनता पार्टी एक बँक असून त्यात गुंतवणूक केली तर चांगला परतावा देऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. ठाकरे बंधूंची लेना बँक आहे. देना बँक नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पाच वर्षे केवळ नक्कलच केली. विकासकामे केली नाहीत. कृष्णकुंज बँकेची शाखा कुठेही नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील प्रचारसभेत असेही मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

नाशिकच्या सभेत मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांची गुंतवणूक भाजपमध्ये करा, असे आवाहनही केले. आजपासून मी नाशिक दत्तक घेतो, अशी घोषणा करतो. येत्या पाच वर्षांत मी नाशिक दत्तक घेऊन नाशिकचा विकास करीन. तुम्ही मला एकहाती सत्ता द्या. भाजपला निवडून द्या. नाशिक शहराचे वैभव पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन मी देतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.उद्धव ठाकरे म्हणतात की कर्जमाफी करायची. ही आमची पण इच्छा आहे. पण त्या शेतकर्‍यांना फक्त कर्जमुक्त नाही, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मग कर्जमुक्त करायचे आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांना फक्त नक्कलच करता येते. गेली पाच वर्षे त्यांनी फक्त नक्कलच केली. विकासकामे केली नाहीत, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्याकडून बोटॅनिकल गार्डनचा जप सुरू आहे. आम्ही दिलेल्या पैशांतून नाशिकमधील कामे झाली, असेही मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाशिकची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत. उद्धव यांनी सांगावे की तुम्ही शेतकर्‍यांमध्ये जाऊन सभा घेतली का? नाशिकच्या छोट्या घरांनाही टीडीआर मिळणार आहे. विकासासाठी राज्याने 2211.19 कोटी रुपये दिले.