मुंबई : भाजपाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष आशिष शेलार व अन्य नेत्यांनी सातत्याने शिवसेनेतील घराणेशाहीवर तोफ़ा डागलेल्या आहेत. पण त्यांच्याच पक्षातील युवा मोर्चामध्ये सर्वच जागा नेत्यांच्य घराणेशाहीने व्यापल्या असल्याची टिका होत आहे. युवा मोर्चा हा जणू पक्षातील बड्या नेत्यांच्या मुलाबाळांसाठीच राखीव असावा, अशी काहीशी स्थिती आहे. त्याकडे आता भाजपा श्रेष्ठींचे लक्ष वेधले गेले आहे. ह्या नात्यागोत्यातून पक्षाच्या युवा मोर्चाला मुक्त करण्याचे आदेश निघाल्याचे कळते.
कॉग्रेसचे नेते नगरसेवक रमेश ठाकूर यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केला त्याची वर्णी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी लावण्यात आली. शिवसेनेसे माजी आमदार सुरेश गंभीर भाजपात आल्यावर त्यांच्या मुलीलाही उपाध्यक्षपद मिळाले. याखेरीज जवळपास प्रत्येक उपाध्यक्ष वा पदाधिकारी कुणा ना कुणा नेत्याच्या आप्तस्वकीयच असावा, याला योगायोग मानता येणार नाही. अधिकाधिक इच्छुकांची वर्णी लागावी, म्हणून मोठ्या संख्येने पदांची निर्मिती करण्यात आली. त्याला कात्री लावण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे कळते.
खुप काम करुनही कुठलेच महत्वाचे पद मिळत नसल्याने नाराज असलेल्या कार्यकर्त्यांची त्यामुळे घुसमट झालेली आहे. अशा कार्यकर्त्यांनी श्रेष्ठी व वरिष्ठांकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. युवा मोर्चा हा नेत्यांच्या मुलांसाठी खाजगी क्लब असल्यासारख्या नेमणूका होत असल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. ज्याचा कोणी पालक आप्तेष्ट नेता नाही, असा पदाधिकारी युवा मोर्चामध्ये सापडणे दुरापास्त असल्याचे सांगितले जाते.