भाजपा, संघाचे राजकारण खोटारडेपणावर सुरु: प्रकाश आंबेडकर

0

मुंबई: देशात नागरिकत्व कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे विधाने परस्परविरोधी असून, भाजपा, आणि संघाचे राजकारण खोटारडेपणावर सुरु असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करणार नाही असं पंतप्रधान जनसभेला संबोधित करताना म्हणतात, मग त्यांचेच गृहमंत्री लोकसभेत एनसीआर लागू करणार असल्याची घोषणा कशी काय करतात? असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) देशावरील संकटं असल्याचा आंबेडकर यांनी म्हटलं. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एनआरसीवरुन खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. एनआरसीबद्दल मंत्रिमंडळात, संसदेत कधीच चर्चाच झाली नसल्याचं मोदी भरसभेत सांगतात. मग अमित शहा लोकसभेत एनआरसी लागू करणार असल्याची घोषणा कशी काय करतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एनआरसी, सीएएबद्दलची आमची भूमिका मुस्लिमकेंद्री नसून भारतकेंद्री असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एनआरसीचा फटका केवळ मुस्लिमांना बसणार नाही. तो हिंदूंनादेखील बसेल, असं म्हणत आंबेडकर यांनी आसाममध्ये राबवण्यात आलेल्या एनआरसीचं उदाहरण दिलं. आसाममध्ये करण्यात आलेल्या एनआरसीमध्ये १९ लाख लोक घुसखोर ठरले. त्यातले १४ ते १५ लाख हिंदू आहेत. त्यामुळे एनआरसीचा फटका हिंदूंनादेखील बसणार हे उघड आहे, असं आंबेडकर म्हणाले.