पिंपरी चिंचवड : अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे नेते पक्ष सोडणार असल्याचे वृत्त प्रसार माध्यमात येत आहे. यात कोणतेही तथ्य नसून राष्ट्रवादीतील काही मंडळी अशा प्रकारच्या ‘अफवा’ पसरवित आहेत. त्यामुळे शहरातील कोणताही नेता भाजपा सोडून जाणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रीया शहरात सुरू असलेल्या चर्चेबाबत महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
पवार म्हणाले की, शहरातील कोणताही नेता भाजपाला सोडून जाणार नाहीत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे चुकीच्या प्रतिक्रीया देऊन शहरात अफवा पसरवित आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी यापूर्वीच भाजप सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी देखील राष्ट्रवादीतील काही मंडळी अशी अफवा पसरवत आहेत. यात कोणतेही तथ्य नाही.
हे देखील वाचा
महापौर राहुल जाधव यांनी देखील सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या असल्याचे सांगितले. आमचे सर्व नेते, नगरसेवक आहोत तिथे आनंदी अन् सुखी आहोत. शहरातील कोणताही नेता पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीत लागलेल्या निकालामुळे राज्यातील भाजपात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. भाजपाविरोधात मतदारांची वाढती नाराजी चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपात गेले होते. मात्र आता सोडून गेलेल्या या मंडळींची लवकरच ‘घरवापसी’ होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेले बडेनेते लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.