भाजपा सोबत युतीस सुरेशदादा जैन यांचा दुजोरा

0

जागा वाटपावरुन वाटाघाटी सुरु; दोन दिवसात अंतिम निर्णय

जळगाव । महापालिका निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीत खाविआ व भाजपा युतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, जागा वाटपाबाबत निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे सांगितले असल्याची माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सांगितले. त्यांनी त्यांचा बंगला 7 शिवाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुरेशदादांनी शिवसेनाप्रमुख ÷उद्धव ठाकरे यांची बैठक घेवून महापालिका निवडणूकीबाबत चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या चिन्हांवर महापालिका निवडणूक लढण्याचा सल्ला दिला. तर वेळप्रसंगी शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्याचीदेखील तयारी असल्याची माहिती सुरेशदादा जैन यांनी दिली़

मुख्यमंत्र्यांसह सेनापक्षप्रमुखांशी चर्चा
काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतांना राज्याचे जलसंपदामंत्री ना. गरीश महाजन व माजी महापौर नितीन लढ्ढा उपस्थित होते़ निवडणुकीत युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले आहेत़ परंतु, जागा वाटपावरुन भाजपा व खाविआमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु आहे. ती पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसांत परिस्थिती स्पष्ट होणार आहे़ ना. गिरीश महाजन यांनी त्यांच्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर कदाचित उद्या चित्र स्पष्ट होईल, असा आशावादही व्यक्त केला.़़मुंबई येथे मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भाजपासोबत खाविआ आघाडीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करुन निर्णय घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. युती करायची असेल तरी वरिष्ठ नेत्यांची कुठल्याही प्रकारची अडचण नाही़ स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याबाबत सांगण्यात आले आहे़ युती झाल्यास पहिला महापौर कोणाचा? असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी सांगितले की, पहिला महापौर आमचा राहील यासाठी आग्रह राहणार आहे़ परंतु, वेळप्रसंगी सव्वा सव्वा वर्ष महापौरपदाचा कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे़ त्यामुळे त्यांचादेखील महापौर असु शकतो़ महापौर कुणाचा यापेक्षा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वय ठेवून युतीचा निर्णय घेण्यात आला आहे़ हे लक्षात घेऊन आपली नेहमी सकारात्मक भूमिका राहणार आहे.

दरम्यान, आज सकाळी सुरेशदादा जैन यांचे मुंबईहून जळगावी आगमन झाले़ त्यानंतर सकाळी 11 वाजेपासून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची मोठी गर्दी जमली होती. युती संदर्भात काय निर्णय झाला हे ऐकून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता पहावयास मिळाली. महापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर डॉ. सुनील महाजन यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांची गर्दी दिसून आली.