भाजप अंतर्गत तडाखे आणि फूट

0

पुण्यातील भारतीय जनता पक्षात सध्या एकमेकांना शाब्दिक तडाखे देणे, उखाळ्या-पाखाळ्या काढणे हे प्रकार पाहिल्यावर मतदार निश्‍चितच अवाक झाले असतील. विशेषतः ज्या काँग्रेसवाल्यांनी भाजपला मते दिली असतील त्यांना तर पस्तावलो असेच वाटत असेल.

भाजपमध्ये काय काय घडले? पाणीपुरवठा निविदात गडबड असल्याची तक्रार त्या पक्षाशी मैत्री असणार्या खासदार काकडे यांनी केली, पुढे जाऊन काकडे यांनी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष यांना बावळट ठरविले, मग भाजपमधील एका गटाने काकडे उपरे असल्याचा सूर लावला. काकडे अपक्ष राज्यसभा सदस्य आहेत. प्रारंभी त्यांनी काँग्रेस पक्षाशी जमवून घेतले होते, लोकसभा निवडणुकीनंतर ते अचानक पुण्यातील भाजपचे तारणहार झाले. भाजपने त्यांना आपल्या पोस्टरवर स्थान दिले. महापालिका निवडणुकीत सारा भाजप जणू त्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर मात्र गाडे घसरत गेले. पालिका पदाधिकारी निवडीत काकडे समर्थकांना वाव मिळाला नाही. काकडे यांना पुण्याबाहेरची जबाबदारी दिली आहे, अशी कुजबूज सुरू झाली. विधानसभेत भाजपला बहुमत मिळावे याकरिता मी फिरणार आहे,असे विधान काकडे यांनी केल्याने कुजबूज खरी वाटू लागली. गेल्या पंधरवड्यात पुन्हा काकडे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले. या काकडे आणि समर्थकांनी भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

यात कहर एका निनावी पत्राने केला आहे.पत्रक काकडे समर्थकाने काढले असावे असे वाटते.पण त्यात पक्षातील नेत्यांचे वर्णन करण्यात आले आहे ते पाहून पुणेकर अवाक झाले आहेत.शिस्तबध्द,सुसंस्कृत आणि अन्य पक्षांपेक्षा वेगळा अशी प्रतिमा भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी तयार केली होती.ती प्रतिमाच गेल्या काही दिवसात पुसली गेली.भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी मूळ धागा तोडून टाकलेला नाही.किंबहुना ते एक पाय बाहेर ठेवूनच भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यांना काकडे यांच्यासारखा नेता मिळालेला आहे.संघाच्या मुशीत तयार झालेले आणि नवागत यांच्यात एक अदृश्य दरी आहे.काँग्रेसचे मिश्रण झालेल्या भाजपमध्ये एकजिनसीपणा येणे केवळ अशक्य आहे.

जे निनावी पत्रक निघाले आहे त्यात संघालाही ओढण्यात आले आहे.भाजपमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीला सामावून घेतले जात नाही,हा अनुभव जुना आहे.जनता पक्षाची फूट त्यातूनच झाली होती, पुण्यापुरते बोलायचे झाल्यास काका वडके यांचे उदाहरण देता येईल.भाजप मध्ये गेलेले काका तिथे रमलेच नाहीत ते पुन्हा शिवसेनेत परतले.सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आपली दारे खुली करून देशभर पक्षांतर घडविले, सत्ता मिळाली पण ज्या प्रवृत्ती आल्या त्यांना आवरणे तूर्त तरी शक्य होत नाही असे दिसू लागले आहे. या घर्षणात यापुढे कोण कोणावर मात करतो हे पाहायचे.

– राजेंद्र पंढरपुरे