नवी दिल्ली : ‘भाजप आणि संघ परिवारात हिंमत असेल तर त्यांनी खरोखर राम मंदिरासाठी अध्यादेश आणून दाखवावाच. मग बघाच काय होतं.’ असं आव्हान एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांनी भाजपला दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीच्या खटल्यावर जानेवारीत सुनावणी घेण्याच्या निर्णयाचंही ओवेसीनी स्वागत केलं आहे.
रामजन्मभूमी खटल्यावर आज सुनावणी होणार होती. पण सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने ही सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलली आहे. तसंच त्यासाठी एका योग्य खंडपीठाची नियुक्तीही केली जाईल अशी घोषणा गोगोई यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे तर असदुद्दिन ओवेसी यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची ५६ इंचांची छाती असेल तर त्यांनी अध्यादेश आणावाच. फक्त अध्यादेशाची भलावण किती दिवस करणार’ असा सवालही ओवेसी यांनी केला आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी करावी अशी मागणी करणाऱ्या भाजप नेते गिरीराज सिंह यांच्यावरही ओवैसी यांनी टीका केली. ‘मोदींनी गिरीराज सिंह यांना देशाचं अॅटॉर्नी जनरल करावं. मग गिरिराज सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन हिंदूच्या भावनांचा मुद्दा सांगावा .आणि मग सर्वोच्च न्यायालयाचं मत ऐकावं’. असंही ओवेसीनी म्हंटल आहे. हा देश संघ-भाजपच्या मनमानीने नाही तर संविधानाने चालेल असंही मत त्यांनी व्यक्त केलं. असा अध्यादेश आणला तर तो भारतीय कायदे व्यवस्थेत कधीच टिकणार नाही असंही त्यांनी सांगितलं.