नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक ; मारूती भापकर यांचा आरोप
पिंपरी चिंचवड: सत्ताधारी भाजप आमदारांकडून शेकडो होर्डिग्ज लावून पिंपरी चिंचवड नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यात येत आहे. ‘आमचे आश्वासने, आमचा पाठपुरावा’ या शिर्षकातून विकास कामांबाबत लावलेली होर्डिंग्ज हे फसव्या जाहिरातीचा प्रकार आहेत. त्यामुळे जुमलेबाजी, जाहिरात बाजी करुन धोकेबाजी करणाऱ्या भाजपकडून सर्वसामान्य जनतेला मुर्ख बनविण्याचा प्रकार चालविला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. तसेच या जाहिरातबाजीला जागृत पिंपरी चिंचवडकर जनता भुलणार नाही, असेही म्हटले आहे.
शहरातील प्रश्न सोडविल्याची जाहीरातबाजी…
मारूती भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात पुणे मुंबई महामार्गावर व शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांचे फोटो असणारे शेकडो फलक लावून ‘आमचे आश्वासने, आमचा पाठपुरावा’ अशा शिर्षकाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामाची जाहिरात करण्यात आलेली आहे. यामध्ये शहरातील अनाधिकृत घरे अधिकृत केले, शास्तीकर माफ केला, शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची स्थापना, प्राधिकरण क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांना साडे बारा टक्के परतावा मिळवून दिला, शहर स्मार्ट केले, मेट्रो निगडीपर्यंत नेणार त्याबरोबर चाकणपर्यंत पोहोचणार, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांना पिंपरी चिंचवड भोसरीमध्ये जागा उपलब्ध करुन देणार, स्मार्ट पोल उभारले, फायबर ऑप्टिक केबलचे साडे सातशे किमीचे जाळे, इंद्रायणी थडीचा थाट, महिला सक्षमीकरणाची सुरुवात आदी मुद्दे घेऊन या शहरातील सर्व प्रश्न सोडविल्याच्या आर्विभावात जाहिरातबाजी करण्यात आली आहे.
जाहीर सभेत नागरिकांना उत्तरे द्या…
पिंपरी चिंचवड शहरातील एकुण अनाधिकृत घरांपैकी मागील पाच वर्षात एकूण घरे नियमित करण्याकरीता किती लोकांनी अर्ज केले. मागील पाच वर्षात एकुण किती घरे नियमित झाले. याचे उत्तर फ्लेक्स लावणाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहरवासियांना व पत्रकारांना एच.ए. मैदानावरती जाहीर सभा लावून द्यावे. शहरातील अनियमित घरांना एकुण ५६७ कोटी रक्कम वसूल करण्यात येणार होती. सुरुवातीला ६०० चौ.फु. नंतर १ हजार चौ. फुटांच्या घरांना शास्ती रद्द करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आल आहे. त्यामुळे केवळ १०० कोटींची शास्ती माफी होणार असून र.रु.४५० कोटी रक्कमेचा पिंपरी चिंचवडकरांचा खिसा दिवसाढवळ्या सत्ताधारी कापणार आहेत. शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची स्थापना केली असे सांगितले आहे. प्रत्यक्षात पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून सगळ्याच प्रकारचे अवैध व्यवसाय व गुन्हे वाढले आहे. प्राधिकरण क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित क्षेत्राच्या साडे बारा टक्यांऐवजी संपादित क्षेत्राच्या ६.२ टक्के परतावा देण्यास सरकारने मान्यता दिली. त्यानुसार प्राधिकरणाच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये डीसी रुल्समध्ये आवश्यक ती सुधारणा करुन प्राधिकरणाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यास अद्याप मान्यता मिळालेली नसताना हा प्रश्न राम भरोसे असताना त्यावर राजकारण सुरु झाले आहे.
मेट्रोचे काम ठप्प…
मेट्रोचे काम पिंपरीपर्यंत ज्या वेगाने सुरु झाले होते, तेवढ्याच वेगाने हे काम ठप्प होत गेले. समन्वयांअभावी हे काम रेंगाळले असून अजून निगडी बहोत दूर है… अशा परिस्थितीत यांनी चाकणपर्यंत मेट्रो पोहोवण्याची भाषा केली आहे. पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांना पिंपरी चिंचवड भोसरीमध्ये जागा उपलब्ध करुन देण्याबाबत मागील दहा वर्षापासून चर्चा सुरु आहे. मात्र अजून मुहूर्त मिळत नाही. संस्था बरोबर मांडवली निट न झाल्यामुळेच हे काम होऊ शकले नाही. पिंपरी चिंचवड शहरातील आपापल्या भागातच स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यासाठी जुंपली आहे. यातच मोठ्या प्रमाणात समन्वयाचा टेंडरमध्ये टक्केवारींचे मोठे राजकारण त्यामुळे एकही प्रकल्प पुर्णत्वात जाऊ शकला नाही. त्यामुळे गैरव्यवहार व भ्रष्टाचारामुळे स्मार्ट सिटी ऐवजी बकाल सिटी झाली आहे. स्मार्ट पोल उभारले. फायबर ऑप्टिक केबलचे साडे सातशे किमीचे जाळे उभारण्यात थेट लोकप्रतिनिधीनीच भागिदाऱ्या केल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात किती काम झाले आणि खर्च किती झाला याचा ताळमेळ ब्रम्हदेवाला देखील बसू शकत नाही.
शहराचा कचरा झाला…
इंद्रायणी थडीचा थाट, महिला सक्षमीकरणाची सुरुवात अशी जाहिरात करुन जणू काही भारतात पहिल्यांदाच महिलांसाठी यांच्या काळात कामचा श्री गणेशा झाला आहे. या थाटात सत्ताधारी भाजपाने जाहिरातबाजी केली आहे. शहरात कचरा प्रश्नामुळे शहराचा कचरा झाला आहे. भामा व आंध्राच्या आरक्षित पाण्याबाबत सत्ताधारी कुचकामी ठरले आहे. पवना धरणाच्या बंद पाईपलाईन प्रकल्प सत्ताधारांच्या निष्क्रीयतेमुळे तुसभर देखील पुढे सरकला नसताना ही जाहिरातबाजी म्हणजे अर्धा हळकुंडाने पिवळे होण्यासारखाच म्हटले पाहिजे. शहरातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केंद्रांतील व राज्यातील नेत्यांप्रमाणेच जुमलेबाजी, जाहिरात बाजी करुन धोकेबाजी सुरु केली आहे. हि शहरातील सामान्य माणसांच्या डोळ्यात दिवसाढवळ्या धुळफेक करुन जनतेला मुर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्यामुळे या खोट्या जुमलेबाजी जाहिरातबाजीला, धोकेबाजीला येथील जागृत, प्रबुध्द पिंपरी चिंचवडकर जनता भुलणार नाही, असे मारूती भापकर यांनी म्हटले आहे.
०००००००००००