भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मागितली माफी

0

नागपूर: विधानसभेत शिवरायांच्या सागरी स्मारकाच्या चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजप आमदार अतुल भातखळकरांना अखेर माफी मागावी लागली. विरोधकांनी मात्र भातखळकरांच्या निलंबनाची मागणी केली. विरोधकांसोबत शिवसेना आमदारांनीही आक्रमक भूमिका घेत भातखळकरांच्या माफीची मागणी केली. सुरूवातीला भातखळकरांनी शब्द मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र विरोधक आणि शिवसेना माफीनाम्यावर ठाम राहिल्यामुळे भातखळकरांवर माफी मागण्याची वेळ आली.

शिवस्मारकाबाबतच्या चर्चेवर बोलतांना आमदार अतुल भातखळकर यांनी ‘भलत्याच’ विषयवार असा शब्दप्रयोग केला. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेत भातखळकर यांच्या निलंबनाची मागणी केली.

स्थगन प्रस्ताव
शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्य़ा पुतळ्यावरून आज विधानसभेत एकच गदारोळ बघायला मिळाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याच्या उंची कमी केलेली नसल्याचा दावा केला. विरोधकांनी गोंधळ घालून वेलमध्ये घोषणाबाजी केली. विरोधकांनी जय भवानी-जय शिवाजीची घोषणाबाजी केली.