भाजप आमदार लक्ष्मण जगतापांकडून बारणेंसाठी काम करण्यास नकार !

0

पुणे: युती होण्यापूर्वी भाजप आणि शिवसेनेचे संबंध अतिशय टोकाला गेले होते. युती होणार नाही हे जवळपास निश्चित मानले जात होते, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली होती. मात्र युती झाली असली तरी अद्याप सेना-भाजप नेत्यांमध्ये काही ठिकाणी पटत नसल्याचे दिसून येते. मावळ मतदार संघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी बारणे यांच्यासाठी काम करण्यास नकार दिला आहे.

जगताप यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वतः मध्यस्थी करत श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप ह्यांच्यात सोबत एक बैठक घेतली. पिंपरी-चिंचवड शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल दीड तास ही बैठक चालली. मात्र, बैठकीदरम्यान आमदार जगताप यांनी काढता पाय घेतला आणि कुठलीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रसंगानंतर संपूर्ण शहरात उलटसुलुट चर्चेला उधाण आले आहे. परंतु, बारणे यांनी भाजपा नेते दोन दिवसांत प्रचारात असतील, असा विश्वास व्यक्त केला.