नगर येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड प्रकरण
आ. संग्राम जगताप निर्दोष; अजित पवारांकडून पाठराखण
अहमदनगर : शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या निर्घृण हत्याकांडप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर नगर पोलिसांना यश आले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी आ. कर्डिले यांच्यासह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली असून, एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनाही अटक करण्यात आली आहे. आ. कर्डिले (भाजप) अन् आ. जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) हे सासरे-जावाई आहेत. तर केडगाव येथील हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर हे आ. कर्डिले यांचे व्याही आहेत. म्हणजेच, एकाच घरात तीनही राजकीय पक्ष असून, हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या न्यायासाठी शिवसेना आक्रमक झालेली आहे. धक्कादायक बाब अशी, की कोतकर-कर्डिले-जगताप यांची नगर शहरात प्रचंड दहशत असून, भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे अद्यापही नगरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. दुसरीकडे, आ. संग्राम जगताप हे निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देत, राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार यांनी आ. जगताप यांची पाठराखण केली आहे. या खुनाचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी तीनपैकी दोन आमदारांना अटक केली असून, राष्ट्रवादीचे आमदार अरुणकाका जगताप मात्र अद्याप फरार आहेत.
नगरमधील बिहारसदृश गुंडगिरी चव्हाट्यावर!
महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर केडगाव उपनगरात शिवसेना उपशहरप्रमुख संजय केशव केतकर, वसंत आनंदा ठुबे या दोघा शिवसैनिकांच्या गोळ्या घालून आणि कोयत्याने हातपाय तोडून भरचौकात निर्घृण हत्या करण्यात आली होती. निवडणूक वादातून हे हत्याकांड झाल्याचे फिर्यादी संग्राम कोतकर यांनी पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद केले आहे. तर पोलिसांनी खुनाचा कट रचणे व खून करणे या कलमान्वये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुणकाका जगताप, आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. यातील दोन आमदारांना अटक झाली असून, आ. अरुणकाका जगताप अद्याप फरार आहेत. आ. संग्राम जगताप यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावले असता, त्यांच्या समर्थकांसह आ. कर्डिले व समर्थकांनी एसपी कार्यालयात तोडफोड करून आ. जगताप यांना उचलून नेले होते. त्या गुन्ह्यात सोमवारी सकाळी नऊ वाजता भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना त्यांच्या निवासस्थातून अटक करण्यात आली. त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. नगर शहरातील या गुन्हेगारी घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून, बिहारमधील गुंडगिरीसदृश परिस्थिती चव्हाट्यावर आली आहे.
हत्याकांडाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना
दरम्यान, या नृशंस हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पोलिस अधिकार्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आल्याची माहिती नगरचे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे. त्यात श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार हे प्रमुख असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार हे या हत्याकांडाचे तपासी अधिकारी आहेत. सहाय्यक पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, पोलिस निरीक्षक सुनील पवार, सुरेश सपकाळे यांचा या एसआयटीत समावेश आहे. केडगाव हत्याकांडात आ. संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे. या खुनाच्या गुन्ह्यात आ. संग्राम जगताप व त्यांचे वडिल आमदार अरुणकाका जगताप (दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस), आमदार शिवाजी कर्डिले (भाजप) या तीन आमदारांसह काँग्रेसचे माजी महापौर संदीप भानुदास कोतकर, भानुदास कोतकर यांच्यासह 30 जणांविरोधात कटकारस्थान रचून खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. या तिघांपैकी आ. अरुणकाका अद्याप फरार आहेत, त्यांच्यासह इतर आरोपींचा शोध एसआयटीला घ्यायचा आहे.
नगरमधील शिवसेनेच्या दोन पदाधिकार्यांची हत्या करणारा हल्लेखोर स्वतः पोलिसांना शरण गेला. वैयक्तिक वादातून ही हत्या केल्याची कबुली त्याने दिली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आ. संग्राम जगताप निर्दोष असून, पोलिस तपासातून ते सिद्ध होईलच. मी संग्रामला चांगले ओळखतो, तो असे काही करेल असे वाटत नाही.
– आ. अजित पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेस