भाजप आ. कर्डिलेंच्या पोलिस कोठडीत वाढ

0

शिवसेना पदाधिकार्‍यांचे हत्याकांड प्रकरण

अहमदनगर : केडगाव येथे झालेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकार्‍यांच्या हत्येनंतर नगर पोलिस अधीक्षक कार्यालयात केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलिस कोठडीमध्ये 12 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आमदार कर्डिले यांना नगर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर शिवसेना पदाधिकार्‍यांच्या खूनप्रकरणी गुन्हा नोंद आहे. त्यानंतर त्यांना पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करून एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

कर्डिलेंच्या कुंडलीत जावई वक्री
शिवसेना पदाधिकार्‍यांच्या खून प्रकरणात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुणकाका जगताप व संग्राम जगताप यांच्यासह 29 आरोपी आहेत. यापैकी आमदार संग्राम जगताप यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच नगर पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्लाप्रकरणीही आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांच्यासह 50 जण आरोपी आहेत. भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे यापूर्वी मोठे जावई संदीप कोतकर यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अशोक लांडे खूनप्रकरणात अडकले होते. कोतकर यांना वाचविण्यासाठी कर्डिले यांनी तडजोड केल्याचा आरोप होता, मात्र या खटल्यातून पुराव्याअभावी कर्डिलेंची निर्दोष सुटका करण्यात आली होती. लांडे खून खटल्यात भानुदास कोतकर यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांना जन्मठेप झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे कर्डिले यांचे दुसरे जावई आहेत. आता केडगावमधील शिवसैनिकांच्या खून प्रकरणात त्यांचे नाव आले आहे. त्यामुळे पोलिसांनी जगताप यांना चौकशीसाठी बोलावून आणले होते. त्यामुळे कर्डिले यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पोलिस कार्यालयावरच हल्ला केल्याच्या आरोपातून कर्डिलेंना अटक करण्यात आली असून, कर्डिलेंच्या कुंडलीत जावई वक्री असल्याचेच या दोन्ही प्रकरणांवरून दिसून येत आहे.