भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून केलेला नास्ता पुण्यात चर्चेत
पुणे : बहुचर्चित राष्ट्रकुल घोटाळ्यामुळे बदनाम झालेले आणि स्वतःसोबत काँग्रेसलाही घेऊन बुडालेले माजी खासदार सुरेश कलमाडी पुन्हा एकवेळ राजकारणात सक्रीय होऊ पाहात आहेत. त्यासाठी गणेश उत्सवानिमित्त ते भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक व प्रादेशिक नेत्यांशी जवळीक साधताना दिसून आलेत. या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांनी नास्ताही केला. गणेश विसर्जन मिरवणुकीतही ते दिसून आले. त्यांच्या या सक्रीय होण्याबद्दल सद्या पुण्यात जोरदार चर्चा होत आहे. कलमाडीसारख्या बदनाम राजकारण्याला सत्ताधारी भाजपवाले आता पवित्र करून घेणार आहेत का? अशी चर्चा यानिमित्ताने पुण्यात रंगली होती. 2011 मध्ये कलमाडी हे राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष असताना आयोजनाचे कंत्राट देण्यात मोठा घोटाळा उघडकीस आला होता. त्याबद्दल संपूर्ण देशाची POजगभरात छी थू झाली होती. तत्कालिन युपीए सरकारने एप्रिल 2011 मध्ये त्यांना अटक केली होती. तसेच, काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली होती. अशा कलमाडींनी सद्या भाजपशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरु केले असून, त्यांना पवित्र करून घेण्यासाठी काही स्थानिक भाजपनेते कामाला लागले असल्याचेही राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.
कलमाडींचे पाप भाजप धुणार का?
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर हजेरी लावली. त्यांनी यानिमित्ताने भाजपच्या नेत्यांसोबत नास्ताही केला. तर त्यांना पुन्हा राजकारणात सक्रीय करण्यासाठी भाजपचाच एक गट कामाला लागला असून, कलमाडींना भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. गणेश विसर्जनानिमित्त कलमाडी यांनी सकाळी महात्मा फुले मंडई येथे जावून कसबा गणपतीचे दर्शन घेतले आणि नंतर एकापाठोपाठ अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्यात. तसेच, लक्ष्मी रोडवरील व्यापारीवर्गाच्याही आवर्जुन भेटीगाठी घेतल्या. ते खासदार असताना कलमाडी यांनी पुणे फेस्टिवल सुरु केला होता. यंदाही पुणे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, पुणेकरांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पुणे फेस्टिवलची फारशी चर्चा झाली नाही. त्याच्या उद्घाटनाला आवर्जुऩ भाजपनेत्यांनी हजेरी लावल्याने मात्र पुणेसह जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली होती. खास करून पालकमंत्री गिरीश बापट व सुरेश कलमाडी यांच्यात अलिकडे निर्माण झालेली जवळीक पुण्यात चर्चेला आली आहे. पुणे फेस्टिवललाही बापट हे इतर भाजप नेत्यांसह आवर्जुन हजर होते. बापट यांच्यासह भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही या फेस्टिवलला हजेरी लावून कलमाडी यांचे पाप धुण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात रंगली होती.
पुण्याची झालेली बदनामी पुणेकर विसरले नाहीत!
राष्ट्रकुल घोटाळ्यानंतर सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने घरचा रस्ता दाखविला. त्यानंतर गेल्या चार वर्षात कलमाडी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. कलमाडींमुळे काँग्रेसची इतकी बदनामी झाली की, या पक्षाला त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरे जावे लागले. पुण्यातील लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तर कलमाडीउद्योगाचा भाजपला मात्र राजकीय फायदा झाला. काही दिवसांपूर्वी पुणे काँग्रेसची सूत्रे पुन्हा कलमाडींकडे सोपविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. परंतु, पक्षातील एका गटाने त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे आपले आता काँग्रेसमध्ये काही खरे नाही, याची जाणिव कलमाडी आणि त्यांच्या समर्थकांना झाली आहे. राष्ट्रकुल घोटाळ्यात झालेली पुण्याची बदनामी पुणेकर विसरू शकले नाहीत. परंतु, काही दिवसांपूर्वीच कलमाडी यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभारवर समाधान व्यक्त करत चांगल्या कामाबद्दल महापौरांना पावती दिल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर कलमाडी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यांनी काल-परवा थेट भाजप नेत्यांबरोबर विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावल्याने कलमाडींच्या भाजपप्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. कलमाडींना भाजपमध्ये घेऊन सत्ताधारीवर्ग पवित्र करणार का? अन् स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार का? अशी चर्चा पुणेकर करत आहेत.