पुणे : स्वीकृत नगरसेवक पदासाठी आधी आश्वासन देऊनही ऐनवेळी नाव कापण्यात आल्याने भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस गणेश घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतच हाणामारी केली. तसे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयासह भाजपचे कार्यालय फोडले. स्वीकृत नगरसेवक पदासाठी घोष यांचे नाव ऐनवेळी रद्द करून माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांचे जाहीर करण्यात आल्याने संतप्त घोष झाले होते. या घटनेमुळे महापालिका भवनात दुपारी खळबळ उडाली. तसेच, या घटनेची शहरभर चर्चा सुरू होती.
पुणे महापालिकेत भाजप प्रथमच पूर्ण बहुमत मिळवून सत्तेत आली आहे. पालिकेत 97 नगरसेवक असलेल्या भाजपचे 3, तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमधून प्रत्येकी एक स्वीकृत सभासद केला जाणार आहे. त्यानुसार भाजपकडून रघुनाथ गौडा, गोपाळ चिंतल आणि गणेश घोष यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ऐनवेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून बीडकर यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब केल्याचे पक्षातून सांगण्यात आले. अचानकच हे चित्र पालटल्याने घोष आणि त्यांच्या समर्थकांनी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरवात केली. या कार्यालयातील टेबल आणि काच फोडण्यात आली. तेथील वातानुकूलित यंत्रणेचीही तोडफोड करण्यात आली.
कार्यालयात काचांचा खच
घोष यांनी रुद्रावतार धारण केला असतानाच बाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाताला येईल त्याची तोडफोड सुरू केली. सभागृह नेत्यांच्या दालनातील खुर्च्यांसह बाकी सामानाचेही नुकसान करण्यात आले. तसेच, संतापाच्या भरात भाजप कार्यालयाचेही नुकसान करण्यात आले. यामुळे संपूर्ण कार्यालयात काचांचा खच पडला होता. या कार्यालयांकडे येण्या-जाण्याच्या मार्गांदरम्यान सुशोभीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या झाडांच्या कुंड्याही फोडण्यात आल्या. तिसर्या मजल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या टेबल-खुर्चीचे तुकडेही सर्वत्र विखुरलेले होते. घोष यांना आवरण्याच्या प्रयत्नात भिमाले यांच्या हाताला जखम झाली. घोष यांनी यावेळी पालकमंत्र्यांसह भाजपच्या सर्व पदाधिकार्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. या सर्व प्रकारात ते जखमी झाले असून, त्यांना कार्यकर्ते आणि नगरसेवक दीपक पोटे यांनी पूना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
भाजप नगरसेवक काँग्रेस कार्यालयात!
हा प्रकार जवळपास 10 मिनिटे सुरु होता. त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी यातून बचावण्यासाठी काँग्रेसच्या कार्यालयाचा आसरा घेतला. अर्ज दाखल करताना एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. महापौर मुक्ता टिळक या स्वतःही दालनात बसून होत्या. याशिवाय सभागृह नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनीही महापौर दालनातच बसणे पसंत केले. बाकी कार्यालयांचे दरवाजे लावून घेतले गेलेे. हा गोंधळ थांबल्यावर कार्यालयांचे दरवाजे उघडण्यात आले.
नुकसान भरून देऊ : महापौर
घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. यातून झालेले महापालिकेचे नुकसान भाजप भरून देणार आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. पक्षाकडून आलेल्या अधिकृत नावांवरच सही केली. या हाणामारीच्या घटनेचा पक्षाच्या पातळीवर गांभिर्याने विचार करण्यात येईल, असेही विचार करण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप
स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीत ऐनवेळी नावात फेरबदल करण्यात आर्थिक देवाण- घेवाण झाल्याचा आरोप भाजपचे काही कार्यकर्ते महापालिका भवनाबाहेर करत होते. भाजप कार्यकर्त्यांच्या या आरोपांमुळे पालिका भवनातील कर्मचारी व उपस्थितही अवाक झाले होते.