भाजप कार्यकर्त्यांमध्ये सरकारविषयी नाराजीचे वातावरण!

0

मुंबई : राज्यामध्ये सरकारच्या विरोधात सोशल मीडिया आणि सामान्य लोकांमधून नाराजीचा सूर निघत असताना आता खुद्द भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील सरकारच्या कामावर नाराज ची असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने चौथ्या वर्षात पदार्पण करूनही महामंडळांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. याशिवाय पाठपुरावा करूनही कार्यकर्त्यांची कामे होत तर नाहीच, त्याचबरोबर पक्षाबाहेरच्याना अधिक मान सन्मान मिळत असल्याने भाजपमध्ये सध्या कमालीचे नाराजीचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचे बोलले जात आहे. फडणवीस हे मंत्रिमंडळच नव्हे तर भाजप पक्षही एकहाती चालवू पाहत आहेत. त्यांच्या या एकहाती मनमानी कारभाराला पक्षश्रेष्टींचाही आशिर्वाद असल्याने दानवे यांच्या मताला फारशी किंमत उरलेली नाही. यामुळे ते स्वतः सुध्दा पक्ष आणि कार्यकर्ते यांच्याकडे लक्ष देताना दिसत नाही, अशी माहिती राज्य भाजप प्रदेश कार्यालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांविषयी नाराजीचे वातावरण असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु असून त्यांची केंद्रात वर्णी लागणार असल्याचा गौप्यस्फोट नुकतेच भाजप मधून बाहेर पडलेले खासदार नाना पटोले यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?
पंधरा वर्षांनंतर आपले सरकार आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला खुप उत्साह होता. मात्र मंत्री आपली कामे करण्यास उशीर किंवा टाळाटाळ करत आहेत हे लक्षात येताच मंत्रालयात जाणे त्यांनी सोडून दिले आहे. पक्षासाठी आपले आयुष्य वेचले असताना आपल्याला डावलून दुसऱ्या पक्षातील लोकांसाठी पायघड्या घातल्या जात असल्याने भाजपात मोठ्या प्रमाणात निराशा दिसून येत आहे. दरम्यान दानवेंच्या कामगिरीवर फडणवीस तसेच मोदी- शहा हे सुद्धा नाराज असल्याने त्यांना लौकरच पायउतार केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या जागी कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ते फडणवीसांच्या खास मर्जीतील आहेत. विशेष म्हणजे शिक्षण मंत्री विनोद तावडेही प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांना कोंडित पकडण्याचा स्वपक्षीयांचा प्रयत्न
भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर राज्यात उसळलेल्या दंगलीला काबुत आणण्यासाठी फडणवीस सरकारच्या एकाही मंत्र्याने आणि पालकमंत्र्याने पुढाकार घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे. पालकमंत्री म्हणून असलेल्या अधिकारात त्यांनी पोलिसांकरवी शांतता बैठकांमधून जिल्ह्यात सतर्क राहण्याऐवजी जवळपास सगळ्याच पालकमंत्र्यांनी आणि राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आक्षेप घेतला जाऊ लागला आहे. यामागे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे. राज्य संकटात असताना मुख्यमंत्री मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यस्त होते. राज्यात दंगलसदृष्य स्थिती असताना मंत्रीही मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत आल्याने संकटकाळात जवळपास सगळेच जिल्हे मंत्र्याविना पोरके होते.