नवी दिल्ली: भाजपाच्या ससंदीय दलाची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्तितीत नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत भाजपाच्या सर्व खासदारांना 2 ऑक्टोबर रोजी पदयात्रा काढण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या आहेत. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपासून या पदयात्रेला सुरुवात होणार असून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपर्यंत ही पदयात्रा चालणार आहे. या बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासमेवत अनेक दिग्गज नेते हजर होते. 150 किलो मीटरची ही पदयात्रा असणार आहे.
या पदयात्रेत खासदार, आमदार, भाजपा नेते आणि कार्यकर्ते हजर असतील. दररोज 15 किमी म्हणजेच 10 दिवसात 150 किमींची पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेतून महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक बुथवर वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. लोकसभेसह राज्यसभेच्या खासदारांनाही ही पदयात्रा करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. याबाबत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली.