ठाणे । पक्षाने आदेश दिल्यास आपण कल्याण लोकसभा निवडणूक लढवू, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजप व शिवसेना युतीत पालघर लोकसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार पाटील बोलत होते. कर्नाटक राज्यात भाजप बहुमताकडे वाटचाल करत आहे.
अशातच राज्यातील भाजप-शिवसेना युतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्यासारखे विधान खासदार पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. खासदार पाटील पुढे म्हणाले, की भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा माझा होमपिच आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. यामुळे भिवंडीत लोकसभा मतदारसंघात पक्षाची स्थिती चांगली आहे. मात्र, पक्षाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आदेश दिल्यास आपण रिंगणात उतरू, असे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपच्या वतीने कल्याण लोकसभेसाठी डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही जोरदार फिल्डिंग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.