2011 मधील घटनेप्रकरणी न्यायालयात कामकाज
मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयात केले होते आंदोलन
जळगाव – पाणी पट्टी करात केलेली वाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी 2011 मध्ये तत्कालीन नगरसेवक व आजी आ. सुरेश भोळे यांच्यासह 23 जणांनी महापालिकेत आंदोलन करत कार्यालयात तोडफोड केली होती. यासह जिल्हाधिकारी कार्यालया जमावबंदी आदेशाने उल्लंघन या दोन्ही प्रकरणांमध्ये शुक्रवारी जिल्हा न्यायालयात कामकाज झाले. यासाठी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह आजी माजी नगरसेवक तसेच आ.सुरेश भोळे यांनी न्यालयालयात हजेरी लावली होती. सर्वांनी हा गुन्हा नाकबूल असल्याचे सांगितले.
पाणीपट्टी वाढ प्रश्नी आयुक्तांच्या कॅबीनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला आ. राजूमामा भोळे, अशोक लाडवंजारी, दीपक साखरे, अरूण बोरोले, सुनील खडके यांच्यासह 23 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. शुक्रवारी यात न्या. जी.जी. कांबळे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यासाठी दुपारी आ. सुरेश भोळे, यांच्यासह 22 आजी माजी नगरसेवक न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने संशयितांना गुन्हा कबुल की नाकबुल असे विचारले असता सर्वांनी गुन्हा नाकबुल केला. या प्रकरणी पुढील कामकाज 12 मार्च रोजी होणार आहे.
उदय वाघ, अशोक लाडवंजारीही न्यायालयात
सन 2011 मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह आ.राजूमामा भोळे, चंद्रशेखर अहिरराव, दिपक फालक, अशोक लाडवंजारी, अरूण बोरोले हे जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी निवेदन देण्यास गेले होते. जमावबंदी कायदा 37(1) चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणीही न्यायालयात झाले. सर्व संशयीतांच्या वतीने अॅड. आनंद मुजुमदार यांनी कामकाज पाहिले.