गोवा/दिल्ली : तीन राज्यांमधील विधानसभेच्या चार जागांसाठी सोमवारी पोटनिवडणूक पार पडली. गोव्यातील पणजी, वालपोई, दिल्लीतील बवाना आणि आंध्रप्रदेशमधील नंद्याल या चार जागांसाठी ही निवडणूक झाली. गोवा येथील दोन विधासभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. पणजीतून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि वालपोई मतदारसंघातून भाजपचे विश्वजित राणे विजयी झाले. तर दिल्लीतील बवाना मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे रामचंदर 24 हजार मतांनी विजयी झाले. आंध्रप्रदेशमधील नंद्याल येथे तेलगू देसम पक्षाचे बी. ब्रह्मानंद रेड्डी विजयी झाले.
4,800 मतांनी पर्रिकर विजयी
सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर गोवा आणि दिल्लीच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. पणजीमध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासमोर काँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर यांचे आव्हान होते. या निवडणुकीत पर्रिकर यांनी चोडणकर यांचा 4,800 मतांनी पराभव केला. तर वालपोईमध्ये आरोग्यमंत्री आणि भाजप उमेदवार विश्वजित राणे हे रिंगणात होते. राणे यांच्याविरोधात काँग्रेसचे रॉय नाईक यांनी लढत दिली. या निवडणुकीत विश्वजित राणे विजयी झाले. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा तब्बल 10 हजार मतांनी पराभव केला.
दिल्लीत आपच; आंध्रात काँग्रेसचा पराभव
दिल्लीतील बवाना येथील पोटनिवडणुकीत आप, भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये लढत होती. आपचे रामचंदर हे 24 हजार मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत राम चंदर यांना 59,886 मते मिळाली. तर भाजपच्या वेद प्रकाश यांना 35, 834 आणि काँग्रेसच्या सुरेंदर कुमार यांना 31,919 मते मिळाली. आंध्रप्रदेशमधील नंद्याल येथे सत्ताधारी तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस यांच्यात लढत झाली. या मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी तब्बल 79.13 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत तेलगू देसम पक्षाचे बी. ब्रह्मानंद रेड्डी विजयी झाले. त्यांनी वायएसआर काँग्रेसच्या एस. मोहन रेड्डी यांचा पराभव केला.