दोन दिवसांची पोलीस कोठडी
पिंपरी-चिंचवड : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र प्रकरणात 20 दिवसांपासून फरार असलेले भाजपचे नगरसेवक तुषार कामठे गुरूवारी सांगवी पोलिस ठाण्यात हजर झाले. यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे फिर्यादी आहेत.
कामठे हे प्रभाग क्रमांक 26चे नगरसेवक आहेत. त्यांच्याविरोधात साठे यांनी 27 ऑक्टोबरला सांगवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहेत. यामध्ये म्हटले आहे, की पिंपळे निलख प्रभागात मागास प्रवर्गातून कामठे यांनी अर्ज भरला. त्यासाठी आवश्यक असणार्या शैक्षणिक कागदपत्रात अकरावी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र जोडले. मात्र, ते खोटे असून अकरावी नापास असतानाही बारावीत प्रवेशासाठी ते जोडले. यामुळे आयोगाची फसवणूक झाली आहे.
यानंतर कामठे फरार झाले. त्यांच्या मागावर पोलिस होते, मात्र ते सापडून येत नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र, अर्ज फेटाळला गेला. नंतर त्यांनी उच्च न्यालयात दाद मागितली. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना लवकरात लवकर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे कामठे आज सांगवी पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाले.