भाजप नगरसेवक तुषार हिंगे ‘वॉण्टेड’ घोषित

0

खुनाचा प्रयत्न, दंगल माजविल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

पिंपरी-चिंचवड : खुनाचा प्रयत्न आणि दंगल माजविल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले भाजप नगरसेवक तुषार हिंगे साडेतीन महिने उलटल्यानंतरही अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे हिंगे यांना ‘वॉण्टेड’ घोषित करून आरोपपत्र दाखल करण्याची नामुष्की निगडी पोलिसांवर ओढविली आहे.

काय आहे प्रकरण..?
पूर्ववैमनस्य आणि आर्थिक व्यवहारातील वादातून 30 सप्टेंबर 2017 रोजी भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी महेश नारायण गारूळे (48) आणि कालिदास गाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या जीवघेण्या हल्ल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी निगडी पोलिसांनी नगरसेवक तुषार हिंगे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी केवळ रोहित गवारे, हेमंत भोसले, चंदन सिंग आणि संतोष साळुंखे या चौघांना अटक केली. तर गोविंद सातपुते, रवींद्र तळेकर, विशाल बाबर, शिवराम चिखले या चार आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविला. मात्र, हिंगे यांच्यासह 11 आरोपी साडेतीन महिने उलटून गेल्यानंतरही पसार आहेत. तीन महिन्यात आरोपपत्र दाखल करावे लागत असल्याने निगडी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले.

अटकेस टाळाटाळ होत असल्याचा आरोप
आरोपपत्र दाखल करताना सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. मात्र, आरोपपत्रावर हिंगे यांच्यासह इतर आरोपींना ‘वॉण्टेड’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हिंगे यांनी अद्याप अटकपूर्व जामीन घेतलेला नाही. राजकीय दबाव आणि पोलिसाचा मुलगा असल्याने त्यांना अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.