स्वत:च्या बेकायदा माहिती दडविल्याची तक्रार
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक 4 (ब) मधील भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण धोंडू उंडे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत माहिती दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची तक्रार वसंत नाथा रेंगडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार देवून नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. तक्रारदार हे महापालिका निवडणुकीत उंडे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार होते.
मिळकत मुलाच्या नावावर हस्तांतर
तक्रारीत म्हटले आहे, की नगरसेवक उंडे यांनी नं.84/2 ब शिवगणेश कॉलनी रोड नं-1 साई पार्क दिघी या पत्त्यावर अनधिकृत बांधकाम केलेले असून त्या घरात वास्तव्य करीत आहेत. परंतु, त्यांनी निवडणूक आयोगाच्या शपथ पत्रात पत्ता बदलून तो प्लॉट नं-31 जयगणेश अपार्टंमेंट सर्व्हे क्रमांक 84 साई पार्क असा दिलेला आहे. अनधिकृत बांधकाम हे त्यांनी स्वतः बांधलेले असताना त्यांनी माहिती दडवून निवडणूक आयोगाची फसवणूक करुन खोटी माहिती सादर केलेली आहे. हे अनधिकृत बांधकाम उमेदवारीसाठी बाधक ठरणार असल्याने ही मिळकत त्यांनी मुलगा दीपक लक्ष्मण उंडे यांच्या नावावर हस्तांतर केला. मात्र, शपथ पत्रात त्यांनी मुलगा कमविता नसून तो माझ्यावर अवलंबून असल्याचे सांगून शपथपत्रात अवलंबित-2 च्या रकान्यात दीपक उंडेच्या नावावर मिळकतीचा उल्लेख केला आहे.
निवडणूक आयोगाची फसवणूक
राज्य निवडणूक आयोगाने अनधिकृत बांधकामामुळे नगरसेवक पद्द करणार असल्याचे नमूद केल्याने नगरसेवक उंडे यांनी कायद्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी पळवाट शोधली आहे. या अनधिकृत बांधकामाला सर्वस्वी नगरसेवक उंडे स्वतः जबाबदार आहेत. निवडणूक काळात त्यांनी निवडणूक आयोगासह महापालिका व जनतेची फसवणूक केली आहे. तसेच त्यांनी जोडलेल्या शपथपत्रातही बांधकामाची टॅक्स पावती, पालिका आरोग्य निरीक्षकांचा सर्च रिपोर्ट, शौचालयाचा दाखला यांचे दस्ताऐवज पुरावे म्हणून देण्यात आलेले आहेत.
पद रद्द करण्याची मागणी
दरम्यान, नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे नगरसेवक पद करुन त्यांच्या कारवाई करावी, अशी मागणी वसंत नाथा रेंगडे यांनी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, महानगरपालिका आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. याबाबत नगरसेवक लक्ष्मण उंडे यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.