महापालिका प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्य निवडीत डावलल्याचा होता आरोप
शहराध्यक्षांची मनधरणी लावली होती धुडकावून : संघटनमंत्र्यांच्या शिष्टाईला यश
पिंपरी-चिंचवड : भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या शिष्टाईला यश आले असून भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सुरू केलेले उपोषण अखेर गुरुवारी रात्री उशिरा मागे घेतले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समवेत निष्ठावंतांची लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन अनासपुरे यांनी दिले. महापालिका प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्य निवडीत निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत काही इच्छुकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.
जगतापांवर हुकूमशाहीचा आरोप
पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी संध्याकाळी समक्ष जाऊन उपोषणकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश मिळाले नाही. उलट शहराध्यक्षांवर हुकूमशाहीचा आरोप करीत उपोषणकर्त्यांनी शहराध्यक्ष हटविण्याची मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून रात्री संघटनमंत्री अनासपुरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी फोनवर संपर्क साधून दिला तसेच उपोषणकर्ते व दानवे यांची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर ऊसाचा रस घेऊन उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण सोडले. भाजपमधील बंड तात्पुरते शमले असले तरी या बंडाचे पक्षांतर्गत राजकारणात काय पडसाद उमटतात, हा राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा विषय बनला आहे.
पक्षात नवा-जुना वाद कायम
दरम्यान, शहर भाजपमध्ये गेल्या तीन वर्षापासून जुने-नवे वाद सुरु आहे. महापालिका निवडणुकीवेळी देखील उमेदवारी नाकाराल्यावरुन निष्ठावंतांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी देखील शहराध्यक्ष हटाव पक्ष बचाव असा नारा देत आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवड झाल्यानंतर देखील भाजपमध्ये मोठा राडा झाला होता. मोरवाडीतील पक्ष कार्यालयासमोर खासदार अमर साबळे आणि राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांचे पुतळे जाळण्यात आले होते. भाजपमधील जुन्या-नव्यातील वाद अजूनही कायम आहे.
ग्रे कलरमध्ये शेजारी पॉईंडर स्वरुपात लावणे
काय आहे नेमके प्रकरण
महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांच्या निवडीत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गुरुवारी सकाळपासून पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. अजय पाताडे, बाळासाहेब मोळक, संतोष तापकीर, शेखर लांडगे, माऊली गायवाड, दत्ता तापकीर, संजय बडे, दिलीप गोसावी, राजू वायसे, बालाजी कानवटे, पोपट हजारे जुन्या कार्यकर्त्यांवर होणार्या अन्यायायाविरुद्ध न्याय मिळण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसले होते.
दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. “प्रभागवरील स्वीकृत सदस्यांची पदे दोन वर्षासाठी दिली आहेत. त्यानंतर तुम्हाला संधी दिली जाईल. परस्थितीतीनुसार काही निर्णय घ्यावे लागत असल्याचे सांगत उपोषणकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, निष्ठावान कार्यकर्ते उपोषणावर ठाम राहिले आहेत. दोन वर्षानंतर हे स्वीकृत सदस्य राजीनामा देतील, याची शाश्वती काय?, यावेळीच समान संधी देणे गरजेचे होते, अशी भावना उपोषणकर्त्यांनी शहराध्यक्षांसमोर मांडली होती. यावेळी सरचिटणीस प्रमोद निसळ, नगरसेवक विलास मडिगेरी, शितल शिंदे, माउली थोरात, सदाशिव खाडे आदी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना अजय पाताडे म्हणाले होते, ‘महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिलेल्यांना आणि बंडखोरी केलेल्यांना प्रभाग समितीवर संधी देण्यात येणार असे पक्षाने ठरविले होते. परंतु, त्यामध्ये बदल करुन बंडखोरी करणार्यांना प्रभागावर संधी दिली आहे. रात्री आम्ही नेत्यांना फोन केले. परंतु, त्यांनी मोबाईल बंद करुन ठेवले. त्यामुळे आमच्यासमोर उपोषणाशिवाय पर्यात नव्हता. आता आम्ही उपोषणावर ठाम आहोत’.
बाळासाहेब मोळक म्हणाले, ‘भाजपमध्ये हुकुमशाही सुरु झाली आहे. पक्षातील हुकुमशाहीला आमचा विरोध आहे. पक्षात व्यक्तीनिष्ठेला महत्व आले असून पक्षनिष्ठा खुंटीला बांधली आहे. शहराध्यक्षांना पक्षाची शिस्त माहिती नाही. संघ परिवार माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्तेतासाठी भाजपमध्ये आलेली टोळी परत कधीही जाऊ शकते. परंतु, आम्ही पक्षात कालही होते, आजही आहोत आणि उद्याही असणार आहोत. कार्यकर्त्यांना समान संधी देण्याची भूमिका शहराध्यक्षांनी पार पाडणे गरजेचे आहे. परंतु, ती भूमिका पार पाडली जात नाही. शहराध्यक्ष हटाव अशी आमची मागणी आहे. पूर्वाश्रमीच्या पिंपरीतील काँग्रेस नेत्याच्या घरी भाजपची बैठक होते. हे अत्यंत चुकीचे आहे. ज्यांना भाजप पक्ष काय आहे, हे माहिती नाही, ते आदेश देतात, याला आमचा विरोध आहे, असेही ते म्हणाले’.