भाजप नेत्यांची लक्तरे वेशीवर टांगणारे पत्रक

0

पुणे । भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची एकेक लक्तरे वेशीवर टांगणारे पत्रक काढले कोणी? याची चर्चा आता पक्षात चालू झाली आहे. या पत्रकामुळे पक्षातील वातावरण बिघडले अशी कबुली एका नेत्याने दिली, अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष घालणे भाग पडेल, असे बोलले जात आहे. त्या निनावी पत्रकात खासदार संजय काकडे यांची फार मोठी भलामण करण्यात आली असली तरी त्यांच्या समर्थकांनी हे पत्रक काढले. यावर अनेकांचा विश्‍वास नाही. भाजपच्या दोन माजी नगरसेवकांचे नाव यात घेतले जाते, पण त्याही बाबतीत ठोस कोणी बोलत नाही. काँग्रेस पक्षातील कोणीतरी हा उद्योग केला असावा असे सांगितले जाते. काकडे यांनी मधल्यामध्ये आपली ताकद दाखवून पुणेकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान वाचविले याचे श्रेय घेतले.

‘तो’ माहितगार असावा हे निश्‍चित
त्या पत्रात भाजपच्या नेत्यांनी संजयनानांचे उंबरठे कसे झिजवले याचे किस्से आहेत. गणेश बिडकर याला आवरा असे सांगण्यासाठी गिरीश बापट नाना यांच्याकडे गेले अशी एक कहाणी आहे. महापौर मुक्ता टिळक यांचा स्वभाव, माजी नगरसेवक अजित आपटे यांची महापौर यांच्या वर्तुळात झालेली एन्ट्री, सभागृह नेते आणि महापौर यांचे ताणलेले संबंध याची माहिती आहे. आमदार आणि नाना, आमदारांची पात्रता याचे उल्लेख आहेत.

जे टिपले आहे तो माहितगार असावा एवढे निश्‍चित म्हणता येईल. या वादात संघालाओढून पत्रकर्त्याने चूक केली आहे, असे मत भाजपच्या एका नेत्याने मांडले.