कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर फसलेला भाजपचा प्रयोग सौदेबाज नेत्यांना चांगलीच ठेच देऊन गेला आहे. त्यानंतरच्या पोटनिवडणुका भाजपला चपराक मारू लागल्या आहेत. जागोजागी पराभवाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून भाजपची लाज राखली आहे. मात्र, यातून धडा घेऊन पुढील रणनीती आखण्यास भाजप सज्ज झाली आहे. बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे तब्बल एक वर्षानंतर पुन्हा एकदा ‘मातोश्री’ बंगल्याची पायरी चढणार आहेत. शिवसेनेला गोंजारण्याचा हा एक प्रयत्न असून, भाजपनेत्यांचे पाय जमिनीवर येण्याचे हे चित्र आहे.
सध्या भारतीय जनता पक्षाचे मिशन ‘आपत्ती व्यवस्थापन’ सुरू झाले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर फसलेला भाजपचा प्रयोग सौदेबाज नेत्यांना चांगलीच ठेच देऊन गेला आहे. त्यानंतरच्या पोटनिवडणुका भाजपला चपराक मारू लागल्या आहेत. जागोजागी पराभवाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावून भाजपची लाज राखली आहे. मात्र, यातून धडा घेऊन पुढील रणनीती आखण्यास भाजप सज्ज झाली आहे. बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे तब्बल एक वर्षानंतर पुन्हा एकदा ‘मातोश्री’ बंगल्याची पायरी चढणार आहेत. शिवसेनेला गोंजारण्याचा हा एक प्रयत्न आहे. याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा युतीच्या वाटाघाटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटावी अशी अपेक्षा बाळगून सत्तेची स्वप्ने पाहणार्या विरोधकांना धक्का बसावा, अशा घडामोडी सध्या सेना-भाजपमध्ये सुरू आहेत.
सेना-भाजप राज्यातील सत्तेत असले, तरी त्यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक त्यांनी स्वतंत्रपणे लढवली होती. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले होते. पालघर पोटनिवडणूक निकालानंतर तर उद्धव युती तोडून सरकार अस्थिर करतील, अशी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर शहा यांच्या भेटीच्या बातमीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क मांडले जाऊ लागले आहेत. राजकारणातील वातावरण यामुळे ढवळून निघत आहे. गेल्या 2 वर्षांत विविध कारणांमुळे झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा झालेला पराभव भाजपच्या लोकसभेच्या 10 जागा कमी करून गेला आहे. ही घसरण विरोधकांना सुखावणारी आणि भाजपला विचार करायला लावणारी आहे. सारे विरोधक एकत्र आल्याने चित्र बदलू शकते हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने स्पष्ट झाले. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष हे पारंपरिक विरोधक एकत्र आल्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फूलपूर लोकसभा मतदारसंघांपाठोपाठ कैरानात विरोधकांचा विजय झाला. बिहारमध्येही गेल्या दोन महिन्यांत चार मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले. पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधकांना बळ मिळू लागल्याने विरोधकांमध्ये साहजिकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या 120 जागा असून, गेल्या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या यापैकी 104 जागा निवडून आल्या होत्या. सारे विरोधक एकत्र आल्यास संख्याबळ नक्कीच कमी होऊ शकते. याचे भान आता भाजप नेत्यांना येऊ लागले आहे. वास्तविक भाजपसाठीही हा धोक्याचा इशारा आहे. शिवसेनेपुढे युतीसाठी हात पुढे करायचा, पण त्याच वेळी शिवसेनेची कुरापत काढायची हे भाजपचे धोरण असते. अन्य मित्रपक्षांना कमी अधिक प्रमाणात असाच अनुभव येतो. मोदींमुळे आपण पुन्हा स्वबळावर सत्तेत येणार, असा भाजपच्या धुरिणांना बहुधा ठाम विश्वास असल्याने मित्रपक्षांना तेवढे महत्त्व दिले जात नाही. पण उद्या संख्याबळ कमी पडल्यास या मित्रांचेच पाय धरण्याची वेळ भाजपवर येऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे तेलुगू देसमने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून घटस्फोट घेतला आहे. शिवसेना अजून सत्तेत चिकटून असली, तरी भाजपप्रणीत आघाडीतून बाहेर पडण्याचा मुहूर्त शोधत आहे. पंजाबमधील अकाली दलही भाजपवर समाधानी नाही. बिहारमधील नितीशकुमार, रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह या आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रियाही भाजपला धार्जिणी नाही. यापैकी राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री कुशवाह यांनी, तर ‘रालोआची गाडी रुळावर आणावी’, अशी विनंती भाजप व पंतप्रधान मोदी यांना केली आहे, अशा सार्या घटना भाजपला चिंतन करायला लावणार्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरून भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेशाध्यक्षांना फाटत चाललेल्या या गोधडीला तत्काळ ठिगळ लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कालची बैठक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे पाहायला पाहिजे. पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपमधील संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत भाजपच्या जिल्हाध्यक्षांची तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या सभेत फडणवीस आणि दानवे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या.
राज्यातील राजकीय वातावरणाचा आढावा घेतानाच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बूथरचना सक्षम करण्याचा संदेशही या वेळी देण्यात आला. सत्तेत सोबत असूनही सतत विरोधात वागणार्या शिवसेनेशी युतीची अजूनही तयारी आहे. मात्र, ते सोबत आले नाहीत, तरीही आपण स्वबळावर निवडणुका जिंकू शकतो. त्यामुळे तशा प्रकारे तयारी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकार्यांना दिल्या. कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्यास तयार राहावे. त्यादृष्टीने गावागावांत संपर्क वाढवावा. दलित वस्त्यामंध्ये प्रचारासाठी जावे, तेथे मुक्काम करावा, पक्षाची मते वाढण्यास मदत होईल, असे कार्यक्रम हाती घ्यावेत, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या. यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दोघे समन्वयाने कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आहेत. या समन्वयाचा प्रचंड अभाव काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. गटबाजीने काँग्रेस पुरती पोखरलेली आहे. प्रचंड पडझड झाली तरी त्यात अजूनही सुधारणा दिसत नाही. भाजपच्या बैठकीच्या पहिल्या सत्रात झालेल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत विभागवार आढावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत बूथरचना, निवडणुकांची तयारी, देशातील परिस्थिती आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जावा यासाठीचा हा प्रयत्न होता. दुसर्या बाजूला शिवसेना या मित्रपक्षाचे काय करायचे यावर व्यवस्थित प्लॅनही आखण्यात आला आहे. शिवसेनेच्या नवीन भूमिकेबाबत भाजपनेत्यांनी चर्चा केली आहे.
शिवसेनेने युतीस नकार दिल्यास चित्र कसे असेल, यावरही चिंतन करण्यात आले आहे. म्हणूनच अमित शहा बुधवारी मातोश्रीवर जात आहेत. दुसर्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आजी माजी आमदार-खासदार यांची भाजपच्या गोटात आवक करून घेण्याचाही भाजपनेत्यांचा मानस आहे. हे असूनही संघप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे पुण्यात एका हॉटेलात भेटले व भंडारा-गोंदिया लोकसभा निकालाचे पेढे दोघांनी एकमेकांना भरवले. यामागचे राजकारण नेमके काय? भंडारा-गोंदिया आणि पालघरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे साटेलोटे झाले काय? असा संशय शिवसेनेला आता येऊ लागला आहे. एकूण काय तर भाजप नेत्यांनी सर्व प्रकारच्या नीतीचा वापर करून पुन्हा आकडा जुळवण्यासाठी कंबर कसली आहे, हे खरे.
– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111