भाजप पदाधिकार्‍यांचा मनपावर मोर्चा

0

जळगाव । महापालिकेवर आज आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शहरातील मंडल अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी शहरातील अस्वच्छता, खराब रस्ते, बंद पथदिवे व पाणी मिळत नसल्याच्या समस्यांबाबत मोर्चा काढला. मनपात सुरू असलेल्या लोकशाही दिनामध्ये हे कामे केव्हा केले जाईल यावर विचारणा केली असता प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दोन वर्ष तुम्हाला हे सहन करावे लागेल असे सांगितले. यावर संतप्त झालेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना आम्ही देखील दोन वर्षे घरपट्टी भरणार नाही, असा इशारा देत अधिकार्‍यांना धारेवर धरत अधिकार्‍यांना घेराव घातला. अखेर अप्पर आयुक्त यांनी आमदार भोळेंना समितीद्वारे महिनाभरात समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

महिला पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांना धरले धारेवर
महापालिकेत आज लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारी सोडविल्या जात होत्या. यावेळी प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्या सर्व विभाग प्रमुख तक्रारदारांच्या समस्या ऐकून घेत होते. त्याचवेळी आमदार भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोर्चा घोषणाबाजी करीत दुसर्‍या मजल्यावरील सभागृहाबाहेर येवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार भोळे यांनी परवानगी द्या अन्यथा लोकशाही दिनात आले म्हणून आम्हाला होईल असा टोला लगावला. यावेळी कानडेंनी परवानगी दिल्यानंतर मोर्चामधील सहभागी पदाधिकारी व कार्यकर्ते न नागरिकांनी सभागृहात प्रवेश केला. सभागृहात मोर्चेकर्‍यांनी प्रवेश केल्यानंतर भाजपच्या मंडल प्रमुखांनी शहरातील विविध समस्यांचे निवेदन आमदार भोळेंनी अप्पर आयुक्तांकडे दिले. तसेच मनपा प्रशासनाकडून या तक्रारी सोडविल्या जात नसल्याचा रोष यावेळी व्यक्त केला. गेल्या अनेक महिन्यापासून शहरात सर्वत्र अस्वच्छता, बंद पथदिवे, व खराब रस्ते तसेच अनेक भागात पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मनपा प्रशासन आर्थिक अडचण असल्याचे दाखवून हे काम करत नसल्याचा आरोप यावेळी केला. प्रशासनाने या समस्यांची सर्व्हेक्षण करुन त्या महिनाभरात सोडवाव्यात अन्यथा नागरिकांचा आक्रोश वाढेल व त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल, तसेच प्रशासनाने या समस्यांची सर्व्हेक्षण करुन त्या महिनाभरात सोडवाव्यात, 25 कोटीच्या निधीतून विस्तारीत भागात गटारी, लाईटची व्यवस्था करावी अन्यथा नागरिकांचा आक्रोश वाढेल व त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील आमदार भोळे यांनी दिला.

समस्या सोडवा, अभिनंदनासाठी येऊ
ज्या प्रमाणे समस्या सोडवाव्यात यासाठी भाजप सदस्य, पदाधिकारी व नागरिक आलेले आहे. त्याच प्रमाणे तुम्ही महिन्याभरात जर या मुलभूत सुविधा नागरिकांना दिल्या तर आम्ही तुमचे अभिनंदन करण्यासाठी देखील या संख्येने येऊ असे मनपा प्रशासनाला यावेळी सांगितले.

आमदारांनी दिले निवेदन
शहर समस्यांचे माहेरघर झाले आहे. जेथे गटारी आहे तेथे स्वच्छता नाही, काही भागात गटारीच नाही, प्रत्येक घरात डेंग्यूचे रुग्ण आहेत. स्वच्छतेअभावी ही परिस्थिती निर्माम झाली आहे. तसेच खड्डेमय रस्ते असून अनेक भागातील पथदिवे बंद अशा विविध समस्यांबाबात वॉर्डनिहाय फोटोसह निवेदन अप्पर आयुक्त कानडे यांना आमदारांनी दिले.

आम्ही दोन वर्ष घरपट्टी भरणार नाही !
यावेळी अप्पर आयुक्तांनी जळगावच नव्हे तर राज्यातील सर्वच शहरात या समस्या आहेत. निधी नसल्याने कामे होत नाहीत. अमृतमधून ही कामे होणार आहेत. मनपा निधीतून तत्काळ ही कामे करणे अवघड असल्याने दोन वर्षे नागरिकांना सहन करावेच लागले असे म्हणाले. यामुळे भाजपच्या महिला आंदोलक संतप्त झाल्यात. जबाबदार अधिकारी असून तुम्ही हे चुकीचे बोलत आहात. मग आम्ही देखील दोन वर्षे घरपट्टी भरणार नाही असे सांगून व्यासपीठाजवळ जावून अप्पर आयुक्तांना घेराव घातला. यावर कानडे यांनी आरोग्य, पाणीपुरवठा, लाईट व विद्युत विभागाचा एक अधिकारी अशी चौघा जणांची समिती करुन समस्यांचे सर्व्हेक्षण करुन महिनाभरात समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.