बढत्यांचे प्रस्ताव नाहक रोखले जात असल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील पदाधिका-यांच्या ’डोस’बाजीमुळे पालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना काम करणे दिवसें-दिवस अवघड होत चालले आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कार्यशैलीमुळे त्रस्त होऊन चार डॉक्टरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर, तीन डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. महापालिकेचे शहराच्या विविध भागात 26 दवाखाने आणि 28 रुग्णालये आहेत. तर, चिंचवड येथे तालेरा, पिंपरीगावात जिजामाता आणि भोसरी येथील रुग्णालयाच्या इमारती बांधून तयार आहेत. मनुष्यबळाअभावी ते सुरु करण्यात विलंब होत आहे. या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव सत्ताधार्यांनी आखला असल्याची चर्चा आहे.
रुग्णालये खासगीकरणाचा घाट?
डॉक्टरांच्या बढत्यांचे प्रस्ताव विनाकारण रोखले जात आहेत. त्यावर पदाधिकार्यांनी प्रस्ताव रोखणा-यांची कानउघाडणी करण्याऐवजी त्यांचे समर्थन केले जात आहे. महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे आयुक्तांनी पालिकेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांनाच बढत्या दिल्या. त्याबाबतचा प्रस्ताव विधी समितीसमोर सादर केला. मात्र, तो विनाकारण गेल्या एक महिन्यापासून तहकूब करण्यात आला. त्यावरून ’विधी’ समितीवर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले आहेत. डॉक्टर पालिकेत काम करण्यासाठी धजावत नाहीत. पालिकेचे दवाखाने बंद पडून आहेत. पालिकेच्या दवाखान्यात नवीन डॉक्टर येण्यास अनउत्सुक आहेत. एकीकडे ’वायसीएम’मध्ये मेडिकल इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा घाट घातला जात असताना जुन्या-जाणत्या डॉक्टरांनी घरवापसी सुरु केली आहे.
यांची स्वेच्छानिर्मिती, राजीनामे
वायसीएम रुग्णालयात कार्यरत असणार्या भुलतज्ज्ञ डॉ. मुग्धा मार्कंडेय, मनोविकृती चिकित्सक डॉ. किशोर गुजर, फिजिशियन डॉ. किशोर खिलारे आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी नगरकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर, तालेरा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश बोबडे, मोशी रुग्णालयातील डॉ. डोळस आणि वायसीएममधील डॉ. शेलार यांनी राजीनामे दिले आहेत.
वायसीएममधील डॉक्टरांना काम जास्त असून मानदेखील तुटपुंजे आहे. डॉक्टरांमध्ये राजकारण सुरू आहे. डॉक्टरांचा मानसिक छळ केला जातो. मुबलक प्रमाणात सोय-सुविधा पुरविल्या जात नाहीत. डॉक्टरांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याला वैतागून आणि आपल्या ’करिअरला’ डाग लागू नये म्हणून पालिकेच्या दवाखान्यातील चांगले डॉक्टर नोकरी सोडून जात आहेत.
-योगेश बहल, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेस