गडचिरोली : धावत्या बसमध्ये तसेच आजूबाजूला प्रवासी असताना एका युवतीवर बलात्कार करणारा भारतीय जनता पक्षाचा गडचिरोलीचा जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी बसमध्ये प्रवास करताना अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरूणीने नागभीड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यान, बावनथडे फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नोकरी व लग्नाचे आमिष दाखवले
नागपूरहून गडचिरोलीकडे निघालेल्या खासगी बसमध्ये 50 वर्षांची व्यक्ती व एक युवती मागच्या आसनावर बसून अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार बसमधील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. या दृश्याचे चित्रीकरण होत असताना बसच्या कॅबिनमध्ये बसलेल्या कर्मचार्यांनी तो बघितला आणि नंतर व्हॉट्सअॅपवर सार्वत्रिक झाला. दोन-तीन दिवसांत हजारो लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. त्यानंतर पीडित युवतीने रविवारी नागभीड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. रवींद्र बावनथडे याने नोकरी व लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून रवींद्र बावनथडेवर गुन्हा दाखल केल्याचे नागभीड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेनेची कठोर कारवाईची मागणी
रवींद्र बावनथडे हा गडचिरोलीमधील आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील कर्मवीर विद्यालयात शिक्षक होता. त्यानंतर त्याची नागभीड येथील शाळेत बदली करण्यात आली. सध्या तो नागभीड येथे कार्यरत आहे. रवींद्र बावनथडे हा भाजपचा जुना कार्यकर्ता आहे. आरमोरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणूनही तो काम पाहतो. बावनथडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरमोरीत पत्रकार परिषद घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पारदर्शक कारभार आणि सुसंस्कृतपक्ष अशी आपली ओळख सांगणार्या भारतीय जनता पक्षाचे नेते बावनथडेवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.