भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण करणार्‍या राज्यमंत्री गुलाबराव पाटलांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

0

जळगाव- पाळधी शिवारात भाजप पदाधिकार्‍यांची गाडी अडवून चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार करतात असे म्हणत शिवीगाळ करत गाडीची तोडफोड केली, तसेच गाडीतील भाजपचे पदाधिकारी किशोर ब्रिजलाल झंवर वय 40 रा. चोरगाव ता.धरणगाव तसेच नितेश विलास पाटील रा. शेरी ता.धरणगाव यांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा तथा जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी मारहाण केल्याची घटना 19 रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात प्रताप पाटील, आबा माळी, राहूल ठाकरे यांच्यासह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अत्तरदेंचा नाही, गुलाबराव पाटलांचा प्रचार कर, तुला 24 नंतर बघून घेतो

किशोर झंवर हे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारार्थ भाडे तत्वावरील गाडी क्र. एम.एच.15.बी.एक्स 3813 घेवून चोरगाव असतांना, पथराड रस्त्यावर पाळधी शिवारात पाटाचे चारीजवळ 20 ते 25 जणांनी गाडी अडवली. तसेच गर्दीतील एकाने प्रताप पाटील यांना फोन केला. पाटील यांनी मी मुले पाठवितो तोपर्यंत गाडी सोडू नका असे सांगितले. काहीवेळाने प्रताप पाटील, आबा माळीसह 10 ते 12 जण आले. त्यांनी झंवर व गाडीतील नितेश पाटील यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर संबंधितांनी पोलिसांना पैसे वाटप करत असल्याची खोटी माहिती दिली. पोलिसांसह पथकाने गाडी तपासली मात्र यात प्रचाराचे साहित्य व्यतिरिक्त काहीच आढळून आले नाही. यानंतर प्रताप पाटील यांनी पाळधी येथे पुन्हा मारहाण करत, झंवर व नितेश पाटील यांना चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार करावयाचा नाही, तू गुलाबराव पाटील यांचेच काम करावे, असा दम दिला व तुला 24 तारखेपर्यंत पाहून घेतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी झंवर व नितेश पाटील यांनी रुग्णालयात उपचार घेतला व यानंतर 20 रोजी त्यांनी धरणागाव पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन प्रताप पाटील यांच्यासह आबा माळी, राहूल ठाकरे व आठ ते दहा जणांविरोधात भादंवि कलम 341, 143, 147, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक हनुमान लहानू हे करीत आहेत.