नवी दिल्ली-भाजप विरोधात एकत्र येत विरोधक महाआघाडी करत आहे. विरोधी पक्षांनी महाआघाडी करणे हा त्यांचा असहाय्यपणा असल्याचा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे कट्टर शत्रू एकत्र आले असून कालपर्यंत जे एकमेकावर टीका करत होते ते आज एकमेकांना मिठ्या मारत असल्याचे आरोप गडकरी यांनी केले.
‘राजकारण हा तडजोड आणि मर्यादेचा खेळ आहे. जेव्हा एखाद्या पक्षाला आपण समोरील पक्षाचा पराभव करु शकत नाही हे माहिती असते तेव्हा ते आघाडी करत आहे असे गडकरी म्हणाले. तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर बोलतांना गडकरी म्हणाले की, ‘मी हा पराभव म्हणून पाहत नाही. भाजपा आणि काँग्रेसच्या जागांमध्ये जास्त अंतर नव्हते. ज्या काही त्रुटी असतील त्यावर आम्ही पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काम करु. आम्हीच निवडणूक जिंकू आणि पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील असा दावा त्यांनी केला आहे.