भाजप मंत्र्यांची होणार झाडाझडती

0

मुंबई (राजा आदाटे)। भाजपच्या अनेक मंत्र्यांवर संकटाची टांगती तलवार असून त्यांची झाडाझडती होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा स्वतः ही झाडाझडती करणार आहेत. येत्या 15 जून ते 16 जूनपर्यंत ते त्यासाठी मुंबईत तळ ठोकणार आहेत. वर्षा बंगल्यावर प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा घेतला जाणार असून कोणत्याही मंत्र्यांने तोपर्यंत मुंबईच्या बाहेर जाऊ नये, असा फतवा भाजपच्यावतीने काढण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी ही पुर्वतयारी आत्तापासूनच सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

मुंबईत तीन ठिकाणी बैठका
जवळपास सर्व निवडणुकांचा टप्पा पार पडला असून भाजपच्या यशाअपयशात प्रत्येकाचा नेमका वाटा किती आहे याचा आढावा यावेळी घेतला जाईल. मिनीविधानसभेच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधीच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी सक्त सुचना सर्वांना दिली होती. त्यांचा परफॉर्मन्स चांगला आढळणार नाही त्यांना नारळ दिला जाईल, असेही त्यांनी बजावले होते. त्याची अंमलबजावणी आता थेट अमित शहांच्या उपस्थित होणार असल्याचे भाजपच्या वरीष्ठ सुत्रांनी सांगितले. तीन दिवसांच्या काळात ते वर्षा बंगल्यावर मंत्र्यांची हजेरी घेतील. सह्याद्री अतिथीगृहावर ते पक्षाच्या आमदारांना भेटतील आणि गरवारे क्लब येते पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.

स्वागताला 10 हजार बाईक
मुंबईत अमित शहांचे जंगी स्वागत होणार आहे. मोठे शक्तीप्रदर्शन यावेळी करण्यात येणार असून त्याच्या ताफ्यासाठी 10 हजार मोटारसायकलस्वार बोलावण्यात आले आहेत. क्रिस्टलचे सर्वेसर्वा आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही बाईक रॅली मुंबई विमानतळ ते दादर येथील वसंतस्मृती या भाजपच्या कार्यालयापर्यंत असेल. बाईकची संख्या वाढावी म्हणून प्रति मोटारसायकलस्वारासाठी क्रिस्टलकडून 1 हजार रूपये देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.

पदाधिकार्‍यांचे रिपोर्ट कार्ड पाहणार
भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकार्‍यांचे रिपोर्टकार्ड यावेळी तपासले जाणार आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांनी केलेली कामगिरी तपासली जाणार असून त्यांच्यावरील जबाबदार्‍या यावेळी निश्‍चित केल्या जाणार आहेत. निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांना योग्य परिस्थिती निर्माण करण्याचे हे प्रयत्न असल्याचे बोलले जाते.