बारामती (वसंत घुले) । बारामतीत बस्तान मांडण्यासाठी भाजपची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत शहर भाजपमध्ये मरगळीचे वातावरण आहे. परंतु येत्या काळात नवीन चेहर्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. सध्याच्या नेतृत्त्वातील काहींची दुहेरी निष्ठा हा चर्चेचा विषय आहे. या दुहेरी निष्ठेमुळे कदाचित पदही जाण्याची शक्यता आहे. यात महत्त्वाच्या पदाधिकार्यांचाही समावेश होता. दिवसभर एका पक्षात तर रात्री दुसर्या पक्षात अशी या पदाधिकार्यांची अवस्था आहे. या दुहेरी निष्ठेमुळे ग्रामीण भागातले तरुण पक्षात येण्यास धजावत नाहीत.
पक्षवाढीसाठी कार्यकर्ते अप्रयत्नशील
तालुका व परिसरात पक्षवाढीसाठी अनुकूल वातावरण असतानादेखील पदाधिकारी प्रयत्न करताना दिसत नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. यातील बरेचसे पदाधिकारी इतर पक्षातील सेवांचा लाभ घेऊन भाजपात आल्यामुळे उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. म्हणूनच पंतप्रधान आवास ही महत्त्वाची योजना ग्रामीण भागात व वाड्यावस्त्यांवर पोहचत नसल्याची खदखद कार्यकर्त्यांमध्ये आहे. याच विषयाचा लाभ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रके छापून नगरसेवकांना या कामास लावले आहे. नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र भाजपचे पदाधिकारी हे शांत का बसून आहेत याचे रहस्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडले आहे.
राष्ट्रवादीतील वजनदार नेता भाजपच्या वाटेवर
दरम्यान राष्ट्रवादीतील दमदार व तडफदार नेता भाजपामध्ये जाणार याचीही चर्चा चांगलीच रंगली आहे. जिल्हापरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीतील बंड थोपविण्यास यश मिळाले असले तरी आता हे बंड थोपविणे अवघड होऊन बसले आहे. बारामतीच्या ग्रामीण भागात या बंडाविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. हे बंड यशस्वी करण्यासाठी भाजपचे उच्चस्तरीय पदाधिकारी सध्या शांत आहेत. यासाठीची योग्य वेळ व अटी न मानता हा दमदार नेता भाजपामध्ये आल्यास भाजपाची निश्चित ताकद वाढणार आहे.
राजकारणाला नवे वळण
राष्ट्रवादीचा हा बडा नेता भाजपामध्ये येऊ नये यासाठी भाजपामधीलच एक बडा नेता सक्रीय आहे. याच नेत्याने जिल्हा परिषद निवडणुकीत काही काम केले नाही. त्यामुळे अपयशाला सामोरे जावे लागले. या तरूण नेत्यामुळे बारामतीच्या राजकीय वातावरणात खूप मोठे बदल होणार आहेत. या बदलावर राज्यस्तरीय भाजपाचे नेतृत्त्व लक्ष ठेवून आहे. अर्थपूर्ण ताकद व लोकांशी संवाद सामाजिक उपक्रमावर भर या तिन्ही बाबी जमेच्या असल्या तरी शांतपणाने निर्णय घेणे हे भाजपाच्या नेतृत्त्वात असल्यामुळे केवळ वाट पाहणे एवढाच सध्यातरी पर्याय आहे.
माळेगाव कारखाना भाजपच्या हातात
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही महिन्यांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमास उपस्थित होते. या उपस्थितीत कारखान्याचे जेष्ठ नेते चंदर आण्णा तावरे, कारखान्याचे अध्यक्ष रंजनकाका तावरे, संचालक यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे हा करखाना भाजपाच्या हातात आला. या घटनेपासून राष्ट्रवादी गटाचे विरोधी संचालक कारखान्याच्या छोट्या छोट्या बाबींमध्ये त्रास देत असल्याची अनेक उदाहरणे चंदर तावरे व रंजन तावरे यांनी मांडली आहेत.
राजकीय घडामोडींना वेग
दरम्यान, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात माळेगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभास मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले जाणार आहे. मधल्या सव्वा महिन्याच्या काळात बारामती तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात भाजप सतत यश मिळवित असल्यामुळे बारामती तालुक्यातही त्याचा परिणाम होत आहे. कदाचित या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी भाजपमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुहेरी निष्ठा व पक्षवाढीस अनुकूल वातावरण तयार न करणे या दोन बाबींवरती गंभीर स्वरुपाची चर्चा सुरू असून मोठा बदल बारामतीतील भाजपमध्ये होणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नवीन चेहर्यांना महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यता आहे.