मोदी, हेच का तुमचे बेटी बचाव धोरण?; गुजरातच्या घटनेवरून राष्ट्रवादीचा संताप

0

मुंबई:गुजरातमधील नरोदातील कुबेरनगरमध्ये रहिवाशांच्या हक्कासाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या वॉर्ड प्रमुख नीतू तेजवानी यांना भाजप आमदार बलराम थवानींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर जहरी टीका केली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा नारा देत सत्तेवर आलेले भाजप सरकार महिलांचा अवमान करण्यात अग्रेसर आहे. देशातील महिलांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांचा सत्तेचा माज उतरवण्याची आता गरज आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. मोदी, हेच का तुमचे बेटी बचाव धोरण? महिलांना मारहाण करणे म्हणजेच ‘पार्टी विथ डिफरन्स’ का? असे सवाल त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अशी वागणूक देऊन जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचे काम भाजपकडून होत आहे,’ असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. देशातील महिलांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांचा सत्तेचा माज उतरवण्याची आता गरज आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.