मुंबई – अहमदनगर महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा मिळवून देखील शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यात आले आहे. भाजपाने राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी अखेर आज सामनामधील अग्रलेखामधून प्रकट झाली. सामन्यातून भाजपवर अतिशय जहरी शब्दात टीका करण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध आहे. त्यातून भाजपला सत्ताभोग घ्यायचा हे भाजपाचे धोरण आहे. त्यांची खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध केले आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाला अहमदनगरमधील राजकीय घडामोडींबाबत आपल्याला माहिती नव्हती, असे सांगितले जात आहे. मात्र शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत. आता राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र हे सगळे ढोंग आहे, अशी टीकाही करण्यात आली.