नवी दिल्ली-आम आदमी पक्षाचे प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुजफ्फरपूर आणि देवरिया येथील बालिकागृहातील मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरून भाजपा सरकारवर निशाना साधला आहे. एक पोस्टर शेअर करत महिलांना गायीसमान सुरक्षा द्या, अशी मागणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये एक महिला ‘गायीसमान सुरक्षा द्या’ असा मजकूर असलेले पोस्टर घेऊन उभी असल्याचे दिसते. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचारांवर झालेल्या वाढीचा आलेख या पोस्टरमध्ये दिसतो. केजरीवाल यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 8, 2018
दिल्लीमध्येही महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. काही दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी दिल्लीतील अनेक ठिकाणाहून मुलींची सुटका केल्यानंतरही दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. भाजपाशी निगडीत अनेक संघटना वेळोवेळी गौ सुरक्षेशी निगडीत प्रश्न उपस्थित करत असतात. त्यामुळेच आपकडून महिलांनाही गायीप्रमाणेच सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशमधील देवरिया आणि बिहारमधील मुझफ्फरपूरमधील मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार आहे. तर बिहारमध्ये भाजपा आणि संयुक्त जनता दलाचे युतीचे सरकार आहे. या घटनेमुळे बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि उत्तर प्रदेशमधील विरोधी पक्ष समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांनी भाजपाविरोधात मोर्चाच उघडला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून महिला सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्याची तयारी करत आहेत.