नवी दिल्ली-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर भाजपविरोधी आघाडी तयार होत असली तरी, त्यात शिवसेनेच्या सहभागाची शक्यता अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु संघवी यांनी फेटाळून लावली. गेल्या चार वर्षांत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार कृषी, उद्योग, रोजगार अशा सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
समाजमाध्यम मालिका
केंद्रातील भाजप सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराचा पंचनामा करणारी जुमला किंग या नावाने प्रदेश काँग्रेसच्या वतीने समाजमाध्यम मालिका सुरू करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन सिंघवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेनाही भाजपच्या विरोधात बोलत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपविरोधात उभ्या राहणाऱ्या आघाडीत शिवसेनेचा सहभाग असेल का, असे विचारले असता, वैचारिक मतभेदाचा मुद्दा उपस्थित करून सिंघवी यांनी त्यावर नकारात्मक उत्तर दिले.
भाजपने गेल्या चार वर्षांत मित्रपक्षांना जी वागणूक दिली, त्यावर नाराज होऊन अनेक घटक पक्ष एनडीएमधून बाहेर पडत आहेत. तेलुगू देसम पक्ष हे त्याचे एक उदाहरण आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपविरोधातील सर्व पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. वास्तविक पाहता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या पक्षाचे कर्नाटकमध्ये काहीही राजकीय अस्तित्व नाही. तरीही त्यांनी काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) सरकार बनविण्याच्या आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.
यूपीए सरकारच्या काळात २०१४ मध्ये कृषी विकास दर ४.२१ टक्के होता, २०१८ मध्ये मोदी सरकारच्या काळात १.९ टक्क्यापर्यंत खाली घसरला आहे.