भाजप व कॉंग्रेसला पर्यायी पक्ष शोधण्याची आवश्यकता-ओवेसी

0

नवी दिल्ली-मुस्लिमांनी राजकीय ताकद दाखवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मुस्लिमांनी आता काँग्रेसवर विश्वास ठेवू नये, आता कॉंग्रेस पक्ष संपला आहे, अशी टीका एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. आता भाजपा आणि काँग्रेसला नवीन पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, असे सूचक विधान करत त्यांनी तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचे संकेतही दिले.

कॉंग्रेसवर विश्वास ठेऊ नका

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने मुखर्जी यांच्यावर पक्षातील नेत्यांनी टीका केली. आता ओवेसी यांनी देखील हैदराबादमधील एका सभेत मुखर्जी यांच्या नागपूर दौऱ्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. जो व्यक्ती एका पक्षात ५० वर्षे होता आणि ते देशाचे माजी राष्ट्रपती देखील आहेत, अशा व्यक्तीने संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावावी आणि इतके  होऊनही तुम्ही काँग्रेसकडून आशा ठेवू शकाल का?, असा सवालच त्यांनी विचारला.

प्रणव मुखर्जींनी हेडगेवार हे भारताचे सुपूत्र असल्याचे सांगितले. पण त्याच हेडगेवार यांनी संघाच्या स्वयंसेवकांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होऊ नका, असे आवाहन केले होते. तसेच महात्मा गांधींच्या हत्येनंतर स्वयंसेवकांनी नथुराम गोडसेंसाठी जल्लोष केला होता, पण दुर्दैवाने काँग्रेसला याचा विसर पडला, असे ओवेसी यांनी सांगितले.

प्रादेशिक पक्षच उत्तम पर्याय

कर्नाटकमध्ये एमआयएमने निवडणूक न लढवता जनता दल सेक्युलर पक्षाला पाठिंबा दिला. आम्हाला कुमारस्वामी यांनी जागांची ऑफरही दिली. पण आम्ही ती नाकारली. आता काँग्रेस व भाजपाला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. प्रादेशिक पक्षच याला उत्तम पर्याय आहे, असे म्हणत त्यांनी तिसऱ्या आघाडीत सामील होण्याचे संकेतही दिले.