तिरुवनंतपूरम : केरळच्या कन्नूरमध्ये पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप शबरीमलाच्या भक्तांच्यापाठी खंबीरपणे उभा असल्याचं स्पष्ट केलं. कोर्ट आणि सरकारनेही आस्थेशी संबंधित आणि ज्याचे पालन केलं जाईल, असेच निर्णय द्यावेत, असं आवाहनही अमित शहा यांनी केलं आहे.तसेच यावेळी त्यांनी केरळ सरकारवरही जोरदार टीका केली.
केरळ सरकारने अयप्पाच्या भक्तांवर दमनचक्र सुरू केलंय, पण भाजप या भक्तांच्यापाठी पहाडा सारखा उभा राहील. जर हे दमनचक्र थांबले नाही तर भाजप कार्यकर्ते त्याला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा देतानाच कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये मंदिरांच्या परंपरा तोडण्याचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
देशातील अनेक मंदिरात विविध परंपरांचं पालन करण्यात येतं. भगवान अयप्पांचेही अनेक मंदिरं देशात असून तिथे महिलांना प्रवेश नाकारण्यात आलेला नाही. या मंदिरात अयप्पाची ब्रह्मचारी मूर्ती असल्यामुळेच महिलांना प्रवेश नाकारला जातो. देशात अनेक मंदिरं अशी आहेत की जिथे केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो. पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. मात्र सर्वजण शबरीमालाच्याच निर्णयाच्या पाठीमागे लागले आहेत, अशी टीकाही शहा यांनी केली.