भाजप सदस्यांकडून स्वकीयांना विरोध

0

जळगाव। जिल्हात भाजप नंबर एकचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर व पक्षाला लाभलेल्या चांगल्या नेतृत्वामुळे पक्ष संघटन मजबुत आहे. मात्र काही दिवसांपासून जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात खडसे व महाजन हे दोन गट असल्याचे सर्व जिल्हा वासीयांना परिचीत आहे. दोन्ही गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये चांगल्या पदासाठी ओढाताण सुरु असते. तीन महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणुक पार पडली. त्यात महत्वाचे पद स्वतःकडे राखुन ठेवण्यासाठी पक्षातंतर्गत चढाओठ झाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेत भाजपाने पहिल्यांदा एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष हे भाजपाचेच आहे. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाची भुमिका नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरम्यान भाजप सदस्यांना स्वकीय झेडपी अध्यक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपाच्याच सदस्यांनी अध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

वकीलांमार्फत नोटीस
जिल्हा परिषद अध्यक्षांनी खातेवाटप करतांना एकाच सदस्यांकडे दोन खाते देऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे उल्लंघन केले आहे. त्यांनी केलेली निवड नियमान्वये बेकायदेशीररित्या आहे. त्यामुळे सात दिवसाच्या आत अध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओंना वकीलामार्फत नोटीस दिली आहे. रजिस्टर स्पीडपोस्टद्वारे सीईओंना नोटीस पाठविण्यात आली आहे.

अध्यक्षांच्या अपात्रतेची मागणी
जिल्हा परिषदेतील विषय समित्यांची सभापती निवडीनंतर तब्बल महिन्याभराने स्थापना करण्यात आली. अध्यक्षांनी बेकायदेशीररित्या खाते वाटप केले असल्याचा ठपका सभागृह सचिवांनी ठेवला आहे. बेकायदेशिररित्या खातेवाटप केले असल्यांने अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी खुद्द भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे वकीलामार्फत नोटीसाद्वारे केली आहे.

खातेवाटप बेकायदेशीर
सभापती निवडीवेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणार माजी बांधकाम अभियंता जे.के.चव्हाण यांच्या पत्नी रजनी चव्हाण यांच्याकडे महिला व बालकल्याण समिती सभापतीपद देण्यात आले होते. विषय समिती खातेवाटप करतांना त्यांच्याकडेच बांधकाम समिती देण्यात आल्याने अगोदर खातेवाटप झालेल्या सदस्यांकडे नियमान्वये पुन्हा खातेवाटप करता येत नसल्याने त्यांची निवड ही नियमबाह्य आहे.

खडसे गटाच्या सदस्यांची नाराजी
जिल्हा परिषदेत एकाच पक्षातील दोन गट सक्रीय आहे. अध्यक्ष हे महाजन गटाचे तर उपाध्यक्ष हे खडसे गटाचे असल्याचे बोलले जाते. दहा ते पंधरा वर्षापासून उपाध्यक्षांकडे असलेले बांधकाम सभापतीपद काढून ते महाजन गटाच्या रजनी चव्हाण यांना देण्यात आल्याने व महत्वाच्या समित्यात खडसे गटाच्या सदस्यांना स्थान देण्यात आले नसल्याने, छुपी कुरबुर खडसे गटाचे सदस्य व्यक्त करतात. याबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे देखील काही सदस्यांनी यापूर्वी सांगितले आहे.