भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली – खासदार सुप्रिया सुळे

0

विविध विकासकामांचे उद्घाटन

भोर : ना प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा झाले, ना दोन कोटी तरुणांना नोकर्‍या दिल्या, ना देशाबाहेरील काळा पैसा आणला, ना अच्छे दिन आले. उलट देशावर 54 लाख कोटींचे कर्ज केले. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेल्या एकाही गोष्टीची पूर्तता केली नाही, तर मोदी आणि फडणवीस यांनी लोकांची फसवणूक केली आहे. यामुळे राज्य आणि देश चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच योग्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बाठे यांच्या विशेष प्रयत्नाने किकवी, पाचलिंगे, मोरवाडी, राऊतवाडी, वागजवाडी येथील 1 कोटी 53 लाख रुपये विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे, प्रदीप खंदारे, संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, सुनीता बाठे, विद्या यादव, नितीन धारणे, शिवाजी कोंडे, मनोज खोपडे, केतन चव्हाण याप्रसंगी उपस्थित होते.

मतदान मतपत्रिकेवर घ्या

मतदान हे यंत्रापेक्षा मतपत्रिकेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीसह इतर 16 पक्षांनी केली आहे, तर मतदान यंत्रातील गैरप्रकाराची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली होती. मात्र सीबीआयवरील विश्‍वास कमी झाल्याचे सुळे यांनी पुढे सांगितले. गोपीनाथ मुंडे यांची हत्या मतदान यंत्रातील गैरप्रकारातून झाली, अशी बातमी परदेशातून आली आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टीची चौकशी आंतरराष्ट्रीय रॉ (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) या संस्थेमार्फत करावी, अशी मागणी सुळे यांनी केली.