भाजप सरकारने सर्वच घटकांची घोर फसवणूक केली- राजू शेट्टी

0

जेजुरी : केंद्रात व राज्यात असलेल्या भाजप सरकारने शेतकरी, सर्वसामान्यांसह सर्वच घटकांची घोर फसवणूक केली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व समविचारी छोट्या-मोठ्या पक्षांना एकत्र आणण्याबाबत मी पुढाकार घेणार आहे. प्रकाश आंबेडकर यांचीही हीच भूमिका असून, भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी एक व्यापक आघाडी करावी. यात छोट्यां पक्षांनाही योग्य स्थान दिले जावे, असे त्यांचे म्हणणे आहे. आंबेडकरांचा हा प्रस्ताव घेऊन मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहे, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी मांडली.

पुण्याजवळील जेजुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्तासंपादन निर्धार मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी म्हणाले, भाजप सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. २०१४ साली गोपीनाथ मुंडेंमुळे आम्ही महायुतीत गेलो. मात्र, आताची भाजप कोणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे यांना सत्तेतून घालविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच कधीकाळी आम्ही विरोध केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची आमची तयारी आहे. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे व योग्य हमी भाव जाहीर केल्यास आम्ही महाआघाडीसोबत जाऊ. सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी किमान समान कार्यक्रम काँग्रेसने आखावा. असे झाल्यास प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीसह मी महाआघाडीत लागलीच जाण्यास तयार आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.