भाजप सरकार आंधळे आणि बहिरे : पटोले

0

कोल्हापूर : राज्यात आणि केंद्रात असलेले भाजप सरकार आंधळे आणि बहिरे आहे. माझ्यावर पक्षाला जी कारवाई करायची आहे ती करू देत, चुका झाल्यावर मी बोलणारच, असे म्हणत भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वपक्षावर टीकास्त्र डागले आहे. सोमवारी पांचाळ समाजाच्या महाअधिवेशनासाठी नाना पटोले कोल्हापुरात आले होते यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

पटोले म्हणाले, शेतकर्‍यांना कर्जमाफी यांनी जाहीर केली मात्र सरकार कर्जबाजारी होत चालल्याचे ऐकले आहे. शेतकर्‍यांना बोगस ठरवणार्‍यांनी गप्प बसलेलेच बरे. सर्व सामान्य जनतेने भाजपला विश्वासाने मते दिली आणि बहुमताने निवडून दिले, मात्र भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेले आश्वासन सत्तेवर आल्यावर पाळले नाही. आश्वासने पाळली असती तर विविध प्रश्नांसाठी लोकांना मोर्चे काढावेच लागले नसते. राज्यातील मंत्र्यांमध्ये सुसूत्रता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील हेच समजत नाही, अशी बोचरी टीकाही पटोले यांनी केली. गिरीश महाजनांसारख्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज द्यायला हवी असा सल्लाही पटोले यांनी दिला.