पुणे-त्रासलेल्या जनतेला चांगल्या पद्धतीचे सरकार देण्याचा प्रयत्न करायचा असून त्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे काहीही झाले तरी येणा-या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार उलथून टाकायचेच आहे हा निर्धार करण्यासाठीच हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
बदल होईल यात शंका नाही
विसावा वर्धापन दिन आहे. याचेच औचित्य साधत आज पक्षाचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेच्या जंगी सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानात ही सभा पार पडणार आहे. स्वतः अजित पवार हे मैदानावर सर्व तयारीचा आढावा घेत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही जनतेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक चांगला संदेश देण्याचे काम करून दाखवू. आणि त्यातूनच परिवर्तनाची लाट निश्चितच निर्माण होईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही असे अजित पावर यांनी सांगितले.
हल्लाबोल यात्रेच्या सांगता सभेला राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे जेलमधून सुटका झाल्यानंतर पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.