अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मेळाव्यात सरकारविरोधी सुर
अंबाजोगाई : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने ओबीसी समाज, विद्यार्थी, युवक व समाजाला डावलून सातत्याने अन्याय करण्याचे धोरण अवलंबिल्याचे प्रदेशाध्यक्ष ईश्वरभाऊ बाळबुधे म्हणाले तर मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करून तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी ओबीसी समाजाला सदैव न्याय देण्याचीच भूमिका घेतली.असे सांगुन ओबीसी समाजाचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना भाजपा सरकारने मानसिक त्रास देवून तुरूंगात डांबले. त्यामुळे या सरकारच्या विरोधात एकत्र येवून ओबीसी समाजाने लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने केज विधानसभा मतदारसंघाचा ओबीसी समाज मेळाव्याचे आयोजन गुरूवार,दि. 25 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. हा ओबीसी समाज मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यास केज मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.पृथ्वीराज साठे तर उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वरभाऊ बाळबुधे,प्रदेशउपाध्यक्ष सचिन आवाटे, जिल्हाध्यक्ष रुख्मानंद खेत्रे,अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती मिनाताई भताने, नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती बबनराव लोमटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उल्हासकाका पांडे, केजचे तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे,राष्ट्रवादी काँग्रेस हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष सय्यद शरिफ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा अंजली पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष धनंजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यास मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष ईश्वरभाऊ बाळबुधे म्हणाले की, देशात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून ओबीसी वर सातत्याने अन्याय केला जात आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवले जात आहे. तसेच ओबीसीं च्या भरतीतील आरक्षणाला भाजप सरकारचा विरोध आहे. मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी भाजपाचे नेते यांनी कुमंडल यात्रा काढुन विरोध केला.या उलट मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात शरदचंद्र पवार यांनी मंडल आयोग लागू केला.त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा फायदा झाला.ओबीसी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला अशी माहिती बाळबुधे यांनी दिली.
यावेळी माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना विनाकारण तुरुंगात डांबून ठेवले होते. त्यामुळे ओबीसींच्या हक्कावर गदा आणणार्या भाजपाला धडा शिकवण्यासाठी शरदचंद्र पवार व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी राज्यभरातील ओबीसी एकत्र येत आहेत.केज विधानसभा मतदारसंघातील ओबीसींनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ओबीसी समाज बाधवांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद द्यावी असे आवाहन केले. हा मेळावा स्व.विलासराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवीकिरण देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रूख्मानंद खेत्रे यांनी करून उपस्थितांचे आभार पंकज रापतवार यांनी मानले.