भाजप-सेनेच्या युतीची चर्चा सुरु 

0
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना विश्‍वास
पिंपरी :  सेना-भाजपच्या युतीबाबत मला तिळमात्र शंका नाही. भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत चर्चा सुरु आहे.लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना पक्ष युती करुन एकत्रित निवडणुका लढवतील, याविषशी अनेक लोकांच्या मनात शंका आहे. राज्यात भाजप-सेना एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करीत असली, तरी त्यांची पाच वर्षांची भांडणे शेवटी मिटतील. त्यामुळे भाजप-सेनेला रिपाइंच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या 40 ते 45 जागा निश्‍चित मिळतील, असा विश्‍वास केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी रिपाइंचे अविनाश म्हातेकर, चंद्रकांता सोनकांबळे, अरिफ शेख, बाळासो भागवत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, रिपाइंचा भाजपला पाठिंबा आहे. भाजप-शिवसेनेची लोकसभेला युती झाल्यास रिपाइंला दोन जागा द्याव्यात, युती न झाल्यास मात्र चार जागांची मागणी करणार आहे. त्यात दक्षिण मुंबई, विर्दभातील रामटेक, पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि उदयनराजे रिपाइंत आले तर सातारा अशा चार जागांवर आम्ही दावा केला आहे.
वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी भाजपला आतुन पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी उघड भाजपबरोबर यावे, मीही यापुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात रिडालोसचा प्रयोग केला आहे. त्यावेळी माझ्याही सभांना गर्दी व्हायची, लोक सभा ऐकून मतदान करीत नव्हती, तो प्रयोग आमचा फसला होता. आताही वंचित आघाडीचा उलट काँग्रेस-राष्ट्रवादीला तोटा होणार आहे. तर एमआयएम देखील भाजपलाच मदत करीत आहे. त्यामुळे वंचित आघाडीचा आम्हाला विशेष काही फरक पडणार नाही.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, व सफाई कर्मचारी तथा दिव्यांग कर्मचा-यांचा अनुशेषा संदर्भातील माहिती घेण्यासाठी केंद्रीय सामिजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री, .रामदास आठवले यांनी महानगरपालिकेच्या संबधित अधिकारी, पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा केली. महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार व अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आज महाराष्ट् राज्य औद्योगिक  विकास महामंडळ, चिचवड येथे झालेल्या बैठकीत महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्य तुषार हिंगे, अतिरिक्त् आयुक्त दिलीप गावडे, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, लक्ष्मण गायकवाड, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, अण्णा बोदडे, चंद्रकांत इंदलकर, स्मिता झगडे, अतिरिक्त् आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, कार्यकारी अभियंता प्रदिप पुजारी, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वारभुवन, बाळासाहेब भागवत, अजिज शेख व मोठया संख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
झोपडपटटी निमूर्लन व पुर्नवसन विभागाअंतर्गत वाटप केलेल्या सदनिकांचा मिळकत कर वाजवी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. ज्याप्रमाणे पुणे व मुंबई महानगरपालिकेमार्फत झोपडपटटींचे पुर्नवसन एसआरए मार्फत केले जाते. त्याच प्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही योजना राबवावी. अशाही प्रकारच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. महापालिकेमधील वर्ग 1 ते वर्ग 4 कर्मचा-यांचा रिक्त् अनुशेष भरणेत यावा अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.