पाचोरा-भडगाव मतदारसंघात रस्ते, सिंचनासह पाणी टंचाईचा प्रश्न महत्त्वाचे
किशोर पाटील, जळगाव: पाचोरा- भडगाव मतदारासंघातील राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पारंपारिक विरोधक आहे. येथील जनतेने आलटून पालटून दोघा पक्षांचे उमेदवार मग ते शिवसेनेचे आर.ओ.पाटील, किशोर पाटील असोत की, राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना आमदार म्हणून पाचोरा-भडगाव तालुक्याचा कारभार सोपविला. विकासकामांच्या मुद्दयावर येथील विधानसभेची निवडणूक होत असली तरी पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न प्रत्येक वेळी कायम राहिला आहे. यंदा विद्यमान आमदारांकडून मोठ्या प्रमाणत विकास कामे केल्याचा दावा करण्यात येत असला तरी निवडणुकीच्या तोंडावर शहरातील खड्डेमय रस्ते, विस्कळीत पाणीपुरवठा, अस्वच्छता, निकृष्ठ विकास कामे ही प्रमुख मुद्दे प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. यासह मतदारसंघातील ईच्छुक उमेदवारांची मोठी संख्या प्रस्तापितांची मोठी डोकंदुखी ठरणारी आहे. युतीचा प्रश्न मतदारसंघासाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. सध्या भाजप-सेना युती असली तरी मतदारसंघात सत्ताधारी शिवसेनेविरोधात भाजपाच प्रमुख विरोधीपक्षाची भूमिका निभावत आहे.
तिरंगी लढतीची शक्यता
अद्यापही राज्यात युतीची घोषणा झालेली नाही. वरिष्ठ स्तरावर जरी युतीची शक्यता असली तरी स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना व भाजप या मित्रपक्षांमध्ये गटबाजी दिसून येत असल्याचे चित्र आहे. त्याचे उदाहरण म्हणून काल पाचोरा तालुक्यात भाजपच्या झालेल्या मेळाव्यांमध्ये पदाधिकार्यांनी थेटपणे युती होवो अगर न होवा मात्र भाजपचा उमेदवारही रिंगणात असेल अशी स्पष्ट घोषणाच करुन टाकली. यंदा विधानसभेच्या आघाड्यात शिवेसना, राष्ट्रवादी व भाजप असे तीनही पक्ष समोरसमोर येवून तिरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र सद्यपरिस्थितीवरुन पाहायला मिळते आहे.
पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकणार का?
युती झाल्यास घोषणेप्रमाणे पाचोरा-भडगाव मतदारासंघाची जागा शिवसेनेकडेच जाईल. कारण विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत . पाचोरा नगरपालिकाही शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मताधिक्यासाठी त्याचा फायदा होवू शकतो. तालुक्यात शिवसेनेचा झेंडा फडकाविणारे आर.ओ.पाटील यांचे निधन झालेे आहे. त्यामुळे त्यांचे पुतणे म्हणून राजकीय वारसा सांभाळणारे विद्यमान आमदार किशोर पाटील यांना मतदारांची सहाभुती मिळेल. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर सकारात्मक परिणाम जाणवेल असे चित्र पाहायला मिळत आहे.
…तर शिवसेना- राष्ट्रवादीत ‘कॉटे की टक्कर ’
खान्देशचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले कै. ओंकार वाघ यांचेही तालुक्यात वर्चस्व होते. ओंकार आप्पा यांनी राजकीय वारसा पूत्र दिलीप वाघ यांच्याकडे सुपूर्द केला. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वाघ यांनी सलग दोन वेळा आमदार राहिलेेले शिवसेनेचे आर.ओ.पाटील यांची हॅट्रिक रोखली होती. त्यामुळेही यंदाच्या निवडणुकीत दिलीप वाघ हे प्रबळ उमेदवार असल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. शिवसेना- भाजपाची युती न झाल्यास भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र युती न झाल्यास तिसरा पर्याय म्हणून म्हणून अपक्ष उमेदवारीची दाट शक्यता आहे. तसेच बहुजन वंचित आघाडीही आपला उमेदवार देवून सामाजिक मुद्यांवरुन ते मते परावर्तीत करु शकतात. असे असले तरी यंदाची निवडणूकीत पारंपारिक विरोधक असलेले शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये ’कॉटे की टक्कर’ पहावयला मिळणार असल्याचे एकंदरित चित्र आहे. भाजपकडून इच्छुकांमध्ये अमोल शिंदे याचा समावेश आहे. युती न झाल्यास भाजपकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. युुती झाल्यास ते बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यानुसार ते तयारीलाही लागले आहेत.
पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्याची अपेक्षा
आर.ओ.पाटील यांच्यासह विद्यमान आमदार किशोर पाटील तसेच दिलीप वाघ यांनी आप-आपल्या काळात अनेक विकासकामे झाले. मात्र पाचोरा तालुक्याला भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. त्यासाठी वाघूर प्रकल्पातून पर्यायी व्यवस्था व्हावी तसेच शेती सिंचनाचा प्रश्न कायम असून त्यासाठी बलून बंधारे व्हावेत, बेरोगजारीचा प्रश्न असून औद्योगिक प्रकल्प उभारण्याची गरज आहे. भडगाव येथील क्रीडा संकुल प्रस्तावित आहे, ते पूर्ण होण्याची गरज आहे. रस्ते, वीज,गटारी या मुलभूत समस्यांव्यतिरिक्त उद्योग, बेरोजगारी, सिंचन या मुद्यावर यंदाची विधानसभा निवडणूक होईल यात शंका नाही.मात्र विद्यमान आमदारांना सिंचनासह पाणी टंचाईचा प्रश्न भोवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.