पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाची सुत्रे हातात घेतली त्या घटनेला शनिवारी 26 मे रोजी 4 वर्षे पुर्ण झाली. फार गाजावाजा न करता अथवा कसलेही सेलिब्रेशन न करता यशश्वी चार वर्षपुर्तीचा आनंद भाजपनेत्यांनी आवंढा गिळावा तसा घशात दाबला आहे. त्याला करणेही तशीच आहेत. देशभरात भाजप विरोधाचे धृविकरण होते आहे की काय? असा संभ्रम निर्माण होवू लागला आहे. शिवाय दिवसागणीक वाढणार्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमंती अन् त्यामुळे उडालेला महागाईचा भडका हा जनसामान्यांच्या मस्ताकाला भिडू लागला आहे. मोदी सरकारविरोधात सामान्य नागरीक आता शिवराळ भाषेत बोलू लागला आहे. राजकिय स्तरावरही भाजपला ब्रेक लागताना दिसत आहे.
भारतीय जनता पक्षाचा वारू भारतातील प्रत्येक राज्यावर सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सुसाट सुटला आहे. शत् प्रतिशत भाजपचा नारा सत्यात उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सतत आकडेमोड सुरू आहे. हे करत असताना त्यांनी बर्याच प्रादेशिक पक्षांना दुखावण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दुसर्या बाजूने अस्वस्थ झालेल्या विरोधकांची घालमेल सुरू झाली होती. कुठे तरी हा संताप एकत्र करून भाजपची गुर्मि उतरवण्यासाठी अनेक जण उत्सूक होते. काँग्रेसने हा मोका साधला आणि कर्नाटक राज्यातील सत्ता स्थापनेसाठी जनता दल सेक्युलरच्या कुमारस्वामी यांच्या शपथविधिी सोहळ्याला सर्वांना एकत्रीत करण्यात आले. भाजप विरोधात एकोप्याचे शक्तीप्रदर्शन घडवून विरोधी गोटात दिलासा निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला.
खरे तर मोदी आणि शहा ही जोडगोळी गोबेल्स तंत्रात पटाईत असलेली बहाद्दर जोडी आहे. त्यांनी भाजप कसा देशभरात पसरत चालला आहे आणि जनमत भाजपच्या बाजूने कसे वाढते आहे त्याची आकडेवारी फारच ग्लोरीफाय करून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात भाजपला राजसत्तेच्या परीक्षेत अगदी काठावर पास होता आलेले आहे. ही सत्य आकडेवारी सांगते.
भारतीय जनता पक्ष 21 राज्यात सत्ता असलल्याचा डंका पिटत आहे. पण तो आकडा फसवा आहे. देशातील 29 पैकी केवळ 10 विधानसभांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. अन्य विधानसभेत भाजपाची सदस्य संख्या शुन्य ते 12 इतकीच आहे. सिक्कीम राज्यात भाजपा शून्यावर आहे. मिझोराममध्येही भाजपाचा आकडा शून्य आहे तर दक्षिणेकडील तामिळनाडूतही भाजपला भोपळाच मिळालेला आहे. आंध्र प्रदेशातील विधानसभेत 175 जागांपैकीभाजपला केवळ 4 जागा जिंरता आल्या आहेत. तर केरळात 140 विधानसभांपैकी अवघी 1 जागा भाजपच्या पदरात पडली आहे. पंजाबमध्ये तर 117 जागांपैकी भाजपला अवघ्या 3 जागा मिळाल्या आहेत. ममता बॅनर्जीच्या बालेकिल्यात म्हणजेच प. बंगालमध्येही भाजपला 294 पैकी केवळ 3 जागा जिंकता आल्या आहेत. आंध्रप्रदेशचे विभाजन करून तयार झालेल्या तेलंगणा राज्यातही भाजपला 119 पैकी केवळ 5 जागाच जिंकता आल्या. राजधानी दिल्लीत तर भाजपला 70 पैकी केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. ओरिसा राज्यातही भाजपटी स्थिती फारशी चांगली नाही. तेथे भाजपला 147 पैकी केवळ 10 जागा जिंकता आल्या आहेत. नागालँडमध्येही भाजपची तीच स्थिती आहे. भाजपला 60 पैकी 12 मिळाल्या आहेत.
मोदी आणि शहा सत्तेचे मोठे सौदागर आहेत. त्यांनी थेट सत्ता मिळत नाही तर आघाडी करून झेंडा रोवण्याचा प्रयत्न काही राज्यांमध्ये केला. मात्र अशी आघाडी करून भाजपा सत्तेवर असलेल्या राज्यातही भाजपची स्थिती अत्यंत वाईटच आहे. आघाडी केलेली चार राज्ये म्हणजे मेघालय, बिहार, जम्मू काश्मिर आणि गोवा ही जर पाहिली तर भाजपची अत्यंत वाईट स्थिती आहे. मेघालयात 60 पैकी 2, बिहार मध्ये 243 पैकी 53, जम्मू काश्मीर मध्ये 87 पैकी 25 तर गोवा राज्यात 40 पैकी फक्त 13 जागा भाजपच्या पदरात पडल्या आहेत. मात्र साम, दाम, दंड आणि भेद या नितीचा वापर करून सत्तेचे सिंहासन गाठण्यात या सौदागरांना यश मिळाले आहे. एकूण परिस्थिती पाहिली तर देशातील 4139 विधानसभा सदस्यांपैकी भाजपाचे फक्त 1516 आमदार आहेत. त्यातही ग्यानबाची मेख आहेच. यातील 950 सदस्य हे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यातील आहेत. यावरून भाजपचा पाया खर्या अर्थाने कोठे रोवलेला आहे ते दिसते. याचाच अर्थ भाजप दाखवते आहे एक चित्र आणि वास्तव आहे दुसरेच.
आपण फक्त आपल्या राज्याचा विचार केला तरी महाराष्ट्रातही फारशी परिस्थिती चांगली नाही. राजकीय परिस्थिती गेल्या चार वर्षांत पार बदलली आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत रालोआने लोकसभेच्या 42 जागांवर विजय मिळवला होता. त्यात 18 शिवसेनेच्या आहेत. रालोओत तेव्हा खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनाही होती. मोदींनी तेव्हा शेट्टींसाठी जाहीर सभाही घेतली होती. आता शेट्टी आघाडीच्या बाहेर आहेत. काँग्रेस सरकार विरोधात वातावरण आणि शिवाय मोदी लाटेचा असरही होताच. आता परिस्थिती बदलत चालली आहे. मित्रपक्ष असलेली शिवसेना आघाडीत तर आहे, परंतु 2019 ची लोकसभा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपला राज्यात जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. आघाडी तोडल्याचा फटका भाजपप्रमाणेच शिवसेनेलाही बसू शकतो. युतीसंबंधीच्या निर्णयाचा थेट परिणाम विदर्भातील 10 पैकी 8, मराठवाड्यातील 8 पैकी 4, पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी 9 आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांवर होऊ शकतो. महायुती झाली नाहीतर दोन्ही पक्षांच्या संयुक्त जागांच्या संख्येत 41 वरून 25 अशी घट होऊ शकते. अर्थात एकूण 16 जागांवर थेट परिणाम होईल. त्याचा फायदा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीलाच होण्याची जास्त शक्यता आहे. पवार त्याच गणितावर नेम साधून आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत आता सतर्क झाले आहेत. महायुती वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. म्हणूनच फडणवीसांनी शरद पवारांच्या फाटलेल्या किशावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. गळणारा प्रत्येक आमदार ते झेलण्याच्या तयारीत आहेत.
विदर्भात भाजपचे 6 व शिवसेनेचे 4 खासदार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे क्षेत्र आहे. भाजपने स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे भाजप बळकट झाले. सेेनेचा विरोध आहे. यवतमाळ-वाशीम सेनेचे गड आहेत. नागपूर गडकरींचा पक्का मतदारसंघ आहे. परंतू मराठवाड्यात भाजप कमकुवत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच मतदारसंघातील आहेत. लातूर हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा गड आहे. त्यांच्या निधनानंतर भाजप मजबूत झाला होते. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये भाजप कमकुवत झाला. म्हणून येथे युती न झाल्यास भाजपची वाटचाल कठीण आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर मोदी लाटेतही पवारांचा प्रभाव कायम राहिला. शरद पवारांचा प्रभाव असलेले क्षेत्र. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत जास्त समृद्ध आहे. 2014 मध्ये मोदी लाट असतानाही 10 पैकी 4 जागी राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. त्यात पवार यांची कन्या सुप्रिया सुळेही आहेत. भाजप-सेना आता मजबूत झाले आहेत. आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईल.
उ. महाराष्ट्रावर भाजपातीलनाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा दबदबा आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे प्रभाव क्षेत्र जरी असते तरी सध्या ते पक्षावर नाराज असल्याने भाजपचे येथे नुकसान होऊ शकते. धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे यांचे क्षेत्र आहे. परंतु त्यांची पकड मजबूत नाही. छगन भुजबळांमुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीची स्थिती चांगली आहे. शिवसेनाही मजबूत आहे. काँग्रेसचे नाशिकात आजिबात अस्तित्व उरलेले नाही. विदर्भ, मुंबई-कोकण व उत्तर महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेचा जास्त प्रभाव राहिला आहे. राज्यातील 65 टक्के क्षेत्रफळ या प्रदेशात येते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रावर प्रभाव आहे. राष्ट्रवादीला चार जागी विजय मिळाला होता. काँग्रेसला मराठवाड्यात केवळ दोन जागी यश मिळाले होते. सा लेखा जोखा पाहिला तर भाजपला शिवसेने समोर लोटांगण घालण्या पलिकडे गत्यंतर नाही अशी सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती आहे. म्हणूनच पडणवीसांनी साम, दाम, दंड भेदचा मंत्र जपने सुरू केले आहे.
-राजा आदाटे