भाजप 21 तर काँग्रेस फक्त 4 राज्यांत

0

मुंबई । भारतीय जनता पक्षाने देशभरात आज निवडणुकीचा जल्लोष साजरा केला. ईशान्येतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाची 21 राज्यांवर सत्ता झाली आहे, तर काँग्रेसच्या हातात फक्त 4 राज्यांची सत्ता उरली आहे. डाव्यांच्या हातात, तर केवळ केरळ राज्य राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. त्यांनी केलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसते आहे. 2014 मध्ये देशातील 35 टक्के लोकसंख्येवर यूपीएचे राज्य होते, तर 22 टक्के लोकसंख्येवर एनडीएचे राज्य होते. मात्र, सध्याचा विचार करता 70 टक्के लोकसंख्येवर भाजपचे राज्य आहे. 21 राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजप हा पहिलाच पक्ष ठरला आहे.

काँग्रेसची होती 13 राज्ये
2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशातील 7 राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती, तर काँग्रेसकडे देशातील 13 राज्यांची सत्ता होती. आता मात्र काँग्रेसकडे पंजाब, कर्नाटक, मिझोराम आणि पुद्दुचेरी या चारच राज्यांची सत्ता आहे. भाजप या ठिकाणी तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचले. डाव्यांचे मतदार असलेले हे मतदार भाजपच्या बाजूने वळले असल्याची शक्यता आहे. कारण गेल्यावेळी भाजपला याठिकाणी फक्त 2 टक्के मते मिळाली होती.

मोदी-शहांचे विशेष लक्ष
प्रचारामध्ये त्रिपुरावर भाजपने चांगलेच लक्ष केंद्रित केले होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी चार प्रचार सभा घेतल्या होत्या. अमित शहांनीदेखील त्रिपुरावर विशेष लक्ष दिले होते तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनीही येथे सभा घेतल्या. 2014 मध्ये केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदी सरकारने ईशान्येकडील राज्यांवर विशेष लक्ष दिले. त्याचा फायदा प्रचारात घेतला. भाजपने माणिक सरकार विरुद्ध मोदी सरकार असाच प्रचार केल्याचे पाहायला मिळाले.येथे गेल्या 25 वर्षांपासून डाव्यांची सत्ता होती. भाजपच्या यशामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सत्ताविरोधी लाट.

आदिवासी मतदार होते निर्णायक
आदिवासींचे हे या भागातील निर्णायक मतदार आहेत असे म्हटले जातात. हे लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. या भागात 30 टक्के मतदार आदिवासी आहेत. त्यांचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येते. पक्षफुटीचा मोठा फटका काँग्रेसला बसल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडे निवडणुकीसाठी मोठा नेताही शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गेल्यावेळी एक तृतीयांश मते मिळवलेल्या काँग्रेसचा यावेळी धुव्वा उडाला. आता भाजपच्या निशाण्यावर कर्नाटक विधानसभेची निवडणूक आहे. भाजपचा कॉन्फिडन्स या निकालाने वाढला आहे.