जळगाव । चौबे शाळेजवळ भाजीपाला घेवून बसलेल्या विक्रेत्यास अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्याने तेथून उठण्यास सांगितल्याच्या कारणावरून विके्रत्याने कर्मचार्यास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीवरून भाजीपाला विके्रत्याविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करीत शर्ट फाडला
शहरातील घाणेकरचौक परिसरातील चौबे शाळेजवळ भाजीपाला विक्रेता सुनिल यशवंत पाटील (रा. शिवाजीनगर) हा भाजीपाला घेवून बसला होता. त्या दरम्यान, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकातील साजीद अली आबीद अली, हरिष सोमा सोनवणे, अनिल शामराव सोनवणे, नसरोद्दीन अजीज भिस्ती, नरेंद्र खंडू गायकवाड आदी कर्मचारी गांधी मार्केट, घाणेकर चौकात अतिक्रमण कारवाई करत होते. चौबे शाळेजवळ पथक आल्यानंतर पथकातील नसरोद्दीन अली यांनी सुनिल पाटील या भाजीपाला विक्रेत्यास भाजीपाला घेवून तेथून उठून जाण्यास सांगितले. यावरून सुनिल याने नसरोद्दीन यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. यानंतर चक्क सुनिल पाटील याने नसरोद्दीन यांना मारहाण करून त्यांचे शर्ट फाडला. इतर कर्मचार्यांनी तात्काळ शनिपेठ पोलिसांना संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून सुनिल पाटील या भाजीपाला विक्रेत्यास ताब्यात घेतले. व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले.